कोरोनामुक्त `बिग बीं`नी असा केला कामाचा श्रीगणेशा
अमिताभ बच्चन यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता
मुंबई : coronavirus कोरोना व्हायरसचा विळखा साऱ्या विश्वात थैमान घालत असतानाच भारतातही याचा अतिशय वेगानं प्रसार झाला. मुंबईमध्ये झपाट्याने कोरोना फैलावला आणि त्याच्या संकटाची किनार दैनंदिन जीवनावर परिणाम करुन गेली. कलाविश्वालाही या घातक संसर्गानं विळख्यात घेतलं.
हिंदी चित्रपट विश्वात महानायक म्हणून ओळख असणाऱ्या अमिताभ बच्चन यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. ज्यानंतर रुग्णालयात रितसर उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले. पुन्हा इथंही उपचार आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगल्यानंतर बच्चन यांनी पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि काहीशा बदललेल्या परिस्थितीत कामाची सुरुवात केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची माहिती देणाऱ्या अमिताभ बच्चन यांनीच आपण कामाचा श्रीगणेशा केल्याचं सांगितलं. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या पर्वाच्या चित्रीकरणास सुरुवात झाल्याचं सांगत त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सभोवताली असणाऱ्या पीपीई किटमधील माणसांना निळ्याशार समुद्राची उपमा दिली.
एक कलाकार म्हणून बिग बी पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागले आहेत. त्यांना साथ मिळत आहे ती म्हणजे या सर्व सहकाऱ्यांची आणि अर्थातच असंख्य चाहत्यांच्या सदिच्छांची.