मुंबई : बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी केलेल्या वक्तव्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावला आहे. शाह यांच्या वक्तव्यानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ज्यानंतर आता कलाविश्वातूनही त्यांच्यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपली प्रतिक्रिया देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 'त्यांना आणखी किती स्वातंत्र्य हवं आहे....', असा थेट प्रश्न खेर यांनी विचारला आहे. 


माध्यमांशी या विषयावर संवाद साधताना खेर म्हणाले, 'आपल्या देशात बऱ्याच बाबतीत स्वातंत्र्य आहे. जिथे तुम्ही सैन्यदलासाठी अपशब्दांचा वापर करु शकता, वायूदल प्रमुखांसाठी वाईट शब्द वापरु शकता, सैनिकांवर दगडफेक करु शकता. तिथे आणखी किती स्वातंत्र्य हवंय तुम्हाला....?' 


शाह जे काही म्हणाले हे त्यांचं वैयक्तिक मत होतं, जे पूर्णपणे सत्य नव्हतं ही बाबही त्यांनी यावेळी नमूद केली. एका मुलाखतीदरम्यान शाह यांनी गोहत्या मुद्द्यावर लक्षवेधी वक्तव्य करत चर्चांना वाव दिला होता. 



नेमकं काय म्हणाले होते शाह? 


आपल्या देशात गायीच्या मृत्यूचं महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे, असं विधान त्यांनी केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर टीकेची मोठी झोड उठली होती. मात्र, 'मी एक भारतीय आहे. या देशाबद्दल मला जे प्रश्न पडले आहेत ते मी उपस्थित केले त्यात माझं काय चुकलं की मला बेईमान ठरवलं जात आहे?', असं म्हणत त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली होती.