मुंबई : आवाज, व्यक्तिमत्वं आणि कायमच छाप पाडणाऱ्या भूमिका यांच्या बळावर अभिनेते अमरिश पुरी यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत असणारं वेगळेपण हे कायमच प्रेक्षकांची प्रशंसा मिळवून गेलं. असे अमरिश पुरी आज आपल्यात नसले तरीही ते भूमिकांच्या माध्यमातून मात्र कायमच स्मरणात असतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुपेरी पडद्यावरील त्यांच्या बहुचर्चित भूमिकांपैकी एक म्हणजे 'मोगम्बो'. 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात पुरी यांनी साकारलेली ही खलनायकी भूमिका नकारात्मक पात्रांना एका वेगळ्याच उंचीवर नेण्यास जबाबदार ठरली. 'मोगॅम्बो खुश हुआ....' असं वजनदार आवाजात म्हणणाऱ्या अमरिश पुरी यांची ही भूमिका खऱ्या अर्थाने अजरामर ठरली. पण, मुळात या भूमिकेसाठी पहिली पसंती पुरी यांना देण्यात आलीच नव्हती. 


पुरी यांनी गाजवलेल्या या पात्रासाठीही पहिली पसंती होती अभिनेते अनुपम खेर यांना. खुद्द खेर यांनीच 'आयएएनएस'शी संवाद साधताना याविषयीची माहिती दिली. 'मिस्टर इंडिया या चित्रपटातील मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी मला पहिली पसंती देण्यात आली होती. पण, जवळपास एक- दोन महिन्यांनंतर माझ्याऐवजी अमरिश पुरी यांची निवड करण्यात आली', असं ते म्हणाले. 


सहसा एखाद्या चित्रपटातून आपल्याला वगळलं असता काहीशी दुखावल्याची भावना मनात घर करते. पण, चित्रपट पाहिल्यानंतर निर्मात्यांचा हा निर्णय अगदी योग्य होता अशीच प्रतिक्रिया खेर यांनी दिली. कलाकारांमध्ये असणारं नातं आणि अतिशय सकारात्मकपणे त्यांच्यात होणारी स्पर्धा याचाच सुरेख प्रत्यय खेर यांनी सांगितलेल्या आठवणीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचला.