मुंबई : मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांनी त्यांच्या रिलेशनशिपची ग्वाही काही दिवसांपूर्वीच दिली. 'इंडियाज मोस्ट वॉण्टेड' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या वेळी मलायका आणि अर्जुन अखेर माध्यमांसमोर फोटोसाठी एकत्र आले. 
अर्जुनच्या बहिणी, जान्हवी कपूर आणि अंशुला कपूर यांनीही त्यांना साथ दिली. मलायका आणि अर्जुनचा हा अंदाज चाहत्यांची मनं जिंकून गेला. अशा या नात्याविषयीच्या अनेक चर्चा होत असताना खुद्द अर्जुननेच त्याविषयी मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने आपल्या नात्याविषयी काही महत्त्वाची माहिती देत इतरांना आपण अजूनही हे नातं लपवून ठेवत आहोत, असं वाटू नये हे स्पष्ट केलं. 'आम्ही त्यावेळी सर्वांसमोर एकत्र येत या नात्याची ग्वाही दिली', असं म्हणत अर्जुननने याचं श्रेय माध्यमांना दिलं. माध्यमांकडे असणाऱ्या समजुतदारपणालाही त्याने या मुलाखतीत दाद दिली. 


'सुरुवातीपासून त्यांच्याकडून मिळालेला आदर, प्रामाणिकपणाची जाणीव आणि सामंजस्यपूर्ण प्रतिसाद पाहता मला त्यांच्यासमोर (माध्यमांसमोर) येण्यास कोणताच संकोचलेपणा वाटला नाही', असं तो म्हणाला. चुकीच्या पद्धतीने एखादी गोष्ट पसरवणं, त्याविषयी आपली मतं मांडणं, लिहिणं यापैकी कोणतीच गोष्ट आपल्या बाबतीत घडली नसल्याचं म्हणत त्याने मलायका आणि त्याचं नातं सर्वांसमोर आणलं. 


'पापराझी' म्हणजेच विविध माध्यमांच्या छायाचित्रकारांनाही आपण, काही लपवत नसल्याचं सांगत जे आहे ते अगदी सहजपणे समोर येईल अशी माहिती दिली. कारण, आम्ही काहीच लपवत नाही आहोत, हा मुद्दा त्याने अधोरेखित केला. आपण काहीच चुकीचं करत नसल्यामुळे आपल्यामुळे शेजारच्यांना त्रास होऊ नये हा त्यामागचा हेतू असल्याचं विधान त्याने केलं. नात्याविषयी माध्यमांना दिलेली माहिती त्यांच्याकडून समंजसपणे समजून घेण्यात आली, असं म्हणत अर्जुनने माध्यमांची या नात्यातील भूमिका स्पष्ट केली. 



लग्नाविषयीचा प्रश्न विचारताच अर्जुन म्हणाला...


मी लग्न नाही करत आहे. मला ठाऊक आहे, याविषयीच्या चर्चांनी जोर का धरला आहे. कारण, माझ्या घरीसुद्धा असेच प्रश्न केले जात आहेत. मुळात हा एक स्वाभाविक भारतीय प्रश्न आहे. साधं तीन दिवसांसाठीही तुम्ही कोणासोबत असाल, तर लगेच लग्नाच्या चर्चा सुरू होतात, असं अर्जुन म्हणाला. सध्याच्या घडीला आपण लग्न करत नसून, अजूनही त्यासाठी काही वेळ आहे असं म्हणत मी जर रिलेशनशिपविषयी काही लपवत नसेन तर, लग्नाविषयी काही का लपवू असा विनोदी प्रतिप्रश्नही त्याने केला. 


अर्जुनचा हाच अंदाज, माध्यमांशी असणारं त्याचं अगदी सहजतेचं नातं पाहता तो कलाकारांच्या या गर्दीतही तितकाच वेगळा आणि खास ठरतो. मुख्य म्हणजे छायाचित्रकारांच्या वर्तुळात त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. एक सेलिब्रिटी असण्यासोबतच एक व्यक्ती म्हणूनही तो नेहमीच सर्वांची मनं जिंकतो.