मुंबई : वाढदिवसाच्या निमित्ताने 'ड्रीम गर्ल' या चित्रपटाच्या दमदार कमाईचा आनंद साजरा करणाऱ्या अभिनेता आयुषमान खुराना याला एका निराशाजनक बातमीलाही सामोरं जावं लागलं आहे. ही बातमी म्हणजे त्याचा नवाकोरा चित्रपट लीक होण्याची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माध्यमांची उपलब्धता आणि त्यांचा सर्रास होणारा वापर पाहता यामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. पण, त्याचा फटका मात्र काही परिस्थितींमध्ये पाहायला मिळत आहे. इंटरनेट, सोशल मीडिया या सर्व माध्यमांचा अतिरेक आणि चुकीच्या मार्गाने होणारा वापर या साऱ्याचे थेट परिणाम मनोरंजन विश्व आणि मुख्यत्वे चित्रपट विश्वाला बसताना दिसत आहेत. 


व्हायरल व्हिडिओंच्या वाढत्या प्रमाणात आता चित्रपटही सर्रास लीक होऊ लागले आहेत. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये लीक होणाऱ्या चित्रपटांमध्ये आता आयुषमान खुराना आणि नुसरत भरुचा यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ड्रीम गर्ल या चित्रपटाचीही भर पडली आहे. 


समीक्षक आणि प्रेक्षकांची सकारात्मक दाद मिळवणाऱ्या या चित्रपटाचं लीक होणं हे अर्थातच त्याच्या कमाईच्या आकड्यांवरही परिणाम करणारं ठरणार आहे. मुख्य म्हणजे कलाकारांची प्रचंड मेहनत आणि त्यानंतर रुपेरी पडद्यावर येणारा त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. पण, काही बनावट वेबसाईटवरुन चित्रपट लीक केले जात असल्यामुळे या साऱ्याला गालबोट लागतं. यापूर्वीही बऱ्याच बिग बजेट चित्रपटांना याचा फटका बसला आहे, तेव्हा आतातरी हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.