मुंबई : 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...' असं गाणं कितीही लोकप्रिय असलं तरीही खऱ्या आयुष्यात मात्र सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरीच गोपनीयता पाळताना दिसतात. चर्चांची वर्तुळं आणि त्यानंतर होणारा प्रश्नांचा भडीमार हे सारं टाळण्यासाठी मौन बाळगण्यालाच अनेक कलाकार प्राधान्य देतात. पण, सध्याच्या घडीला अभिनेता हर्षवर्धन राणे मात्र या साऱ्याचा शह देत असल्याचं स्पष्ट होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मोहोब्बते' फेम अभिनेत्री किम शर्मा हिला डेट करत असल्याच्या प्रश्नाचं उत्तर देत हर्षवर्धनने बऱ्याच चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने याविषयीचा खुलासा केला. 


'मी खुलेपणाने बोलणारा व्यक्ती आहे. गोष्टी लपवून ठेवण्याकडे माझा कल नसतो. अर्थात मी रिलेशनशिपमध्ये आहे. पण, ही अत्यंत खासगी बाब आहे. समोरच्या व्यक्तीविषयी विचाराल तर त्यांच्या विचारांचा आणि गोपनीयतेचा मी आदर केला पाहिजे हेसुद्धा खरं. आता माझ्या कुठे जाण्या-येण्याविषयी सांगावं तर, तेही सर्वांसमोर स्पष्ट आहेच', असं तो म्हणाला.



फार कमी वयातच आपण घरातून पळालो होतो, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपण सायबर कॅफेमध्ये काम केलं होतं, इतकच नव्हे तर, टेलिफोन बुथमध्येही काम केलं होतं, असा खुलासा त्याने केला. या साऱ्यामध्ये लपवून ठेवण्यासारखं काहीच नाही हेच त्याने स्पष्ट केलं. 


किमसोबतच्या नात्याविषयी बोलताना आता यामध्ये लपवण्यासारखं काहीच नसल्याचं सांगितलं. विविध ठिकाणी आम्हाला एकत्र पाहिलं गेलं असून, ते काही कामानिमित्तं नव्हतं. त्यामुळे आता त्याविषयी नेमकं काय बोलावं हेच आपल्याला कळत नसल्याचं म्हणत, त्याने रिलेशनशिपची बाब एका अर्थी स्वीकारत नात्याविषयी होणाऱ्या चर्चांना दुजोरा दिला. 


एकिकडे हर्षवर्धनने किमसोबतच्या त्याच्या नात्याविषयी खुलेपणाने भाष्य केलं असलं तरीही किम मात्र यावर मौन पाळून आहे. असं असलं तरीही तिच्या सोशल मीडिया पोस्ट मात्र फार काही सांगून जातात. त्यामुळे बी-टाऊनमध्ये आता या नात्याचीही चर्चा रंगणार असं म्हणायला हरकत नाही.