मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेता हृतिक रोशन याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने म्हणजे सुझान खान हिने सोशल मीडियावर नुकतेच हृतिकसोबतचे काही सुरेख फोटो पोस्ट केले आहेत. त्याला निमित्तही तसंच आहे. हृतिकच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने ही खास पोस्ट लिहिली असून त्यांच्या मैत्रीच्या नात्याला इथे अधोरेखित केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Happiest happy birthday to my BFF.... असं लिहित तिने हृतिकसोबतचे आणि आपल्या कुटुंबासोबतचे काही खास फोटो शेअर केले. अवघ्या काही तासांमध्ये सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले हे फोटो पाहून चाहत्यांनीही कमेंट बॉक्समध्ये बी- टाऊनच्या या 'ग्रीक गॉड'ला म्हणजेच हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे फोटो पाहता त्या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा जवळीक येत असल्याचा अंदाज बांधण्यास अनेकांनीच सुरुवात केली आहे. 



बऱ्याच वर्षांचं वैवाहिक नातं संपुष्टात आणत हृतिक आणि सुझानने घटस्फोट घेतला होता. पण, त्यानंतरही सुट्टीवर एकत्र जाणं, एकमेकांच्या कौटुंबीक समारंभांना हजेरी लावणं अशा अनेक निमित्तांनी त्यांना एकत्र पाहिलं गेलं. किंबहुना हृतिकला अडचणीच्या प्रसंगीही तिची साथ लाभली होती. त्यामुळे त्यांच्या नात्याचं हे वेगळेपण खऱ्या अर्थाने अनेकांचीच मनंही जिंकून गेलं. २००० साली या दोघांचाही विवाह झाला होता. जवळपास १४ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्काच बसला होता.