मुंबई :  Coronavirus कोरोना व्हायरसच्या संकटप्रसंगी मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांसोबतच आता थेट याचे परिणाम अनेकांच्या दैनंदिन व्यहरांमध्ये विशेष म्हणजे आर्थिक गणितांमध्ये दिसून येऊ लागले आहेत. हीच परिस्थिती पाहता, बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने पुढाकार घेत कलाविश्वातील छायाचित्रकारांना मदतीचा हात दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यमवर्गीय कुटुंबातील सेलिब्रिटी छायाचित्रकारांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या हृतिकचे विरल भयानी यांनी आभारही मानले आहेत. कोरोना व्हायरसच्या या प्रसंगामध्ये त्याची ही मदत अत्यंत उपयोगाची ठरल्याचं म्हणत त्यांनी या अभिनेत्याचे आभार मानले. 


एका सोशल मीडिया पोस्टमध्ये भयानी यांनी लिहिलं, 'सारं जग सध्याच्या घडीला एका कठिण प्रसंगातून जात आहे. ज्यामुळे पगारकपात, नोकऱ्या जाण्याचा धोका, मीडिया हाऊसवर टांगती तलवार आली आहे. या विषाणूने आपणा सर्वांची परिस्थिती अत्यंत वाईट केली आहे.' 


आपल्याकडे कामाला असणारे आणि सेलिब्रिटींची झलक टीपण्यासाठी सातत्याने प्रयत्नांत असणाऱ्या छायाचित्रकारांना त्यांचा पगार देण्याचं आणि अप्रत्यक्षरित्या त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेणं आपल्यासाठीसुद्धा आव्हानाचं होतं. पण, या परिस्थितीमध्ये हृतिकने पुढाकार घेत मध्यमवर्गीय आणि अतीमध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या या पापराझींना मदत देऊ केली आहे. 



 


अनेक सेलिब्रिटींनी यापूर्वी रोजंदारी भत्त्यावर काम करणाऱ्या मजुरांसाठीच्या निधी योजनेत योगदान दिलं आहे. पण, त्याचा फायदा या पापराझींना मात्र होत नाही. त्यामुळे हृतिकची ही मदत समाजातील एका वर्गाला तूर्तास दिलासा देणारी ठरत आहे हे खरं. बी- टाऊनच्या या ग्रीक गॉडची, म्हणजेच हृतिकची त्याच्या या भूमिकेसाठी चाहत्यांकडूनही प्रशंसा केली जात आहे.