प्रेरणा कोरगांवकर, झी२४तास, मुंबई : अनेक अडचणी पार करत अखेर प्रदर्शनाच्या वाटेवर आलेल्या अभिनेता हृतिक रोशन याच्या 'सुपर ३०' या आगामी चित्रपटाला पुन्हा एकदा अडचणींचा सामना करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटासमोर उभी राहिलेली आव्हानं आणि एकंदर परिस्थिती पाहता 'सुपर ३०' वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. आयआयटीच्या काही विद्यार्थ्यांनी 'सुपर ३०'चं प्रदर्शन रोखण्यासाठी कंबर कसली आहे. २०१८ मध्ये या विद्यार्थ्यांनी ' आयआयटीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिल्याचा आनंद कुमार यांचा दावा खोटा आहे ' अशी जनहित याचिका न्यायालयात दाखल केली होती. याबाबत आनंद कुमार यांच्या विरोधात अद्यापही खटला सुरुच आहे. त्यामुळे हे प्रकरण निकाली निघण्याचीच अनेकांना प्रतिक्षा आहे. 


अशा परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित झाल्यात त्या माध्यमातून चुकीचा संदेश जाऊ शकतो, त्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन थांबणं गरजेचं असल्याचं मत संबंधित विद्यार्थ्यांच्या वकीलांनी म्हटलं आहे. 


दरम्यान, मागच्या वर्षी सुरु झालेल्या #MeToo मोहिमेअंतर्गत निर्माते-दिग्दर्शक विकास बहल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे विकास बहल यांना चित्रपटातून हटवण्यात आलं. ज्याचे थेट पडसाद चित्रपटावर झाले, परिणामी   चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी २७ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. पण, २५ जानेवारीला कंगना रानौतचा 'मणिकर्णिका' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होण्यासाठी सज्ज होता. त्याला जोड होती हृतिक आणि कंगनाच्या वादाची. त्यमुळे काही नव्या वादाने डोकं वर काढू नये यासाठी हृतिक एक पाऊल मागे आला आणि त्याने पुन्हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली.


२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'काबिल' चित्रपटानंतर हृतिक रोशनचा कोणाताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झालेला नाही. या चित्रपटानंतर तो लगेचच 'सुपर ३०'च्या कामाला लागला होता. पण, सुरुवातीपासूनच या चित्रपटाच्या वाटेतील अडचणी मात्र कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीत हे खरं.