मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी Nawazuddin Siddiqui हा त्याच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखला जातो. गँगस्टर, चोर, पोलीस, सर्वसामान्य व्यक्ती अशा अनेक भूमिका तो तितक्याच प्रत्यकारीपणे साकारतो. प्रत्येक भूमिकेचा गाभा ओळखत त्या अनुषंगानं अभिनय सादर करणारा हा अवलिया सध्या आघाडीच्या आणि तितक्याच मानाच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. पण, इथवर पोहोचण्याचा त्याचा प्रवास काही सोपा नव्हता. नवाजला यासाठी संघर्ष करावा लागला होता. त्याच्या काही भूमिका या वगळण्यातही आल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी बरोबर वाचलंत... नवाजची एक लहानशी भूमिका कमल हासन यांनी वगळली होती. ज्यामुळं तो अक्षरश:  ढसाढसा रडला होता. 'स्पॉटबॉय ई'शी संवाद साधताना नवाजनं याबाबतची माहिती दिली. 


आपल्या कारकिर्दीतील या टप्प्याविषयी सांगताना तो म्हणाला, 'असं अनेकदा झालं आहे की मी कोणा एका चित्रपटामध्ये एक लहानशी भूमिका साकारली आहे आणि त्यानंतर त्यावर कात्री मारण्यात आली आहे.  पण, एक किस्सा माझ्यासाठी आदर्शस्थानी असणाऱ्या कमल हासन यांच्याशी जो़डला गेला आहे. तो मी कधीच विसरु शकत नाही'. 


हा किस्सा सांगत असताना नवाजनं 'हे राम' या चित्रपटाशी निगडीत आठवण सांगितली. 'या चित्रपटासाठी मी त्यांचा हिंदी प्रशिक्षक होतो. या चित्रपटाचं दिग्दर्शनही तेच करत होते आणि मुख्य भूमिकेतही तेच होते. ज्यावेळी त्यांनी मला या चित्रपटात एका लहान भूमिकेसाठी विचारलं तेव्हा मला फार आनंद झाला. कमल हासन हे माझ्यासाठी कायमच आदर्श. त्यात त्यांनी माझ्यासाठी दिलेली ही भूमिका एक महत्त्वाची संधी होती. मला यामध्ये एका पीडित व्यक्तीची भूमिका साकारायची होती, ज्याला गर्दीतील लोक बेदम मारत असतात आणि कमल हासन त्याला वाचवतात. हासन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळणार हे पाहून मला फाय आनंद झाला होता. पण, नंतर माझ्या भूमिकेवर कात्री मारण्यात आली. मला जेव्हा हे कळलं तेव्हा मी फार रडलो होतो'. 


 


आपल्याला त्यावेळी कमल हासन यांची मुलगी श्रुती हिनं दिलासा दिला होता असं सांगत त्यांनी भूमिकेला कात्री मारण्याचा निर्णय घेतला तरीही त्यांच्याविषयी आपल्या मनात कोणतीही द्वेषभावना नव्हती हे मात्र नवाजनं न विसरता सांगितलं.