बॉलिवूडचे दिवंगत दिग्गज अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांना एकदा बिग बॉसने (Bigg Boss) ऑफर दिली होती. राजेश खन्नादेखील शोमध्ये झळकण्यासाठी जवळपास तयार झाले होते. मात्र नंतर कलर्स टीव्ही (Colors TV) चॅनेलनेच त्यांना नकार दिला. राजेश खन्ना यांचे जवळचे मित्र पत्रकार अली पीटर जॉन यांनी Rediff ला 2012 मध्ये दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.  अली पीटर जॉन हे शेवटच्या दिवसांपर्यंत राजेश खन्ना यांच्यासह होते. बिग बॉसचे निर्माते आणि राजेश खन्ना यांच्यात नेमकं काय बिनसलं होतं हे त्यांनी सविस्तरपणे सांगितलं होतं. 


'बिग बॉसचे निर्माते प्रत्येक एपिसोडसाठी 3.5 कोटी देण्यास तयार होते'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अली पीटर जॉन यांनी सांगितलं होतं की, "एकदा बिग बॉसच्या निर्मात्यांनी मला फोन करुन राजेश खन्ना यांच्यासह मीटिंग ठरवण्यास सांगितलं होतं. त्यांना ते बिग बॉसमध्ये हवे होते. पण ते म्हणाले, नाही नाही, राजेश खन्ना असले शो थोडीच करणार. मी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण ते नाही म्हणाले. कलर्स टीव्हीच्या लोकांनी मला सांगितलं की, जर ते शोमध्ये झळकले तर आम्ही त्यांना प्रत्येक एपिसोडसाठी 3.5 कोटी देण्यास तयार आहोत. पण ते नाही म्हणाले".


पुढे त्यांनी सांगितलं की, "काही दिवसांनी त्यांनी मला फोन केला आणि शो करण्यास तयार आहे असं सांगितलं. पण तोपर्यंत चॅनेलला त्यांच्यात रस उरला नव्हता. त्यांच्या मृत्यूच्या अडीच महिने आधी मी त्यांना भेटलो होतो आणि काय झालं अशी विचारणा केली होती. ते मला म्हणाले होते, जर गालिब दारु पिऊन मरु शकतो, तर मी का नाही?".


'राजेश खन्ना राजाप्रमाणे जगले'


याच जुन्या मुलाखतीत, राजेश खन्ना यांच्या मित्राने सांगितलं की, "ते गुंतवणुकीच्या बाबतीत फार हुशार होते. काम करत नसले तरी त्यांच्याकडे फार गुंतवणूक होत्या. ते राजाप्रमाणे जगले. बंगला एखाद्या राजवाड्यासारखा दिसावा यासाठी त्यांनी त्याचं काम करुन घेतलं होतं". ट्विंकल खन्ना आणि रिंकल खन्ना यांना ‘घराचं राजेश खन्ना संग्रहालयात रूपांतर करायचं होतं’ असाही खुलासा त्यांनी केला.


भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महान आणि सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे, राजेश खन्ना यांचा जन्म डिसेंबर 1942 मध्ये झाला आणि जुलै 2012 मध्ये मृत्यू झाला. 2013 मध्ये, त्यांना मरणोत्तर पद्मभूषण, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. त्यांनी दो रास्ते, बंधन (1969), सच्चा झुठा (1970), दुश्मन (1971), अपना देश (1972), रोटी (1974), आप की कसम (1974), आणि प्रेम कहानी (1975) यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.