अभिनेता राजपाल यादवला अटक; तीन महिन्यांचा तुरुंगवास
राजपाल यादवने पाच कोटींचे कर्ज घेतले होते.
मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याला शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या निर्णयानंतर राजपाल यादवला तात्काळ अटक करण्यात आली. राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा यांनी 'अता पता लापता' या चित्रपटाच्या निर्मितीसाठी २०१० मध्ये एका इंदूर येथे राहणाऱ्या सुरेंदर सिंह यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतले होते.
सप्टेंबर २०१५ मध्ये उधारीची ही रक्कम परत करण्यासाठी राजपाल यादवने सुरेंदरसिंह यांना मुंबईतील अॅक्सिस बॅंकेचा एक चेक दिला होता. मात्र, बँकेत गेल्यानंतर हा चेक बाऊन्स झाला. धनादेश न वठल्याच्या प्रकरणानंतर सुरेंदर यांनी राजपालला एक नोटीस पाठवत याप्रकरणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजपालने याप्रकरणी कोणतेही उत्तर दिले नाही. अखेर सुरेंदर यांनी न्यायालयात धाव घेत राजपालविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर राजपाल यादवला सत्र न्यायालयाने याचिकाकर्त्याला तडजोडीची रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र, राजपालने ही रक्कमही सुरेंदर यांना दिली नाही. अखेर आज उच्च न्यायालयाने त्याला कारावासाची शिक्षा सुनावली.