मुंबई : अभिनेता Sanjay Dutt संजय दत्त याला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाची लागण झाल्याची माहिती समोर आली आणि साऱ्या कलाविश्वाला हादरा बसला. सध्या संजय दत्त याला फुफ्फुसाच्या कर्करोगाची लागण झाली असून, त्यासाठी तो लवकरच परदेशात उपचार घेण्यासाठी रवाना होऊ शकतो अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजूबाबाला या गंभीर आजारानं ग्रासल्याचं कळताच त्याच्यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केली. तर, कलाविश्वातील मित्रमंडळींनीसुद्धा त्याला धीर दिल्याचं पाहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनस्क्रीन 'संजू' म्हणजेच अभिनेता रणबीर कपूर यानं त्याची प्रेयसी आलिया भट्ट हिच्या जोडीनं संजय दत्तची भेट घेतली. बुधवारी रात्री उशीरा रणबीर आणि आलियाला संजूबाबाच्या घरातून बाहेर पडताना पाहिलं गेलं. या कलाकारांच्या काही फॅन क्लब्लने सोशल मीडियाच्या माध्यमातून या क्षणांचे काही फोटोसुद्धा शेअर केले. 


रणबीर कपूर आणि संजय दत्त यांचं नातं तसं फार खास आहे. 'संजू' या ब़ॉलिवूडपटामध्ये रणबीरनं संजय़ दत्त याचीच व्यक्तीरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी संजय दत्तशी संवाद साधण्यापासून ते अगदी त्याचे स्वभावगुण जाणून घेईपर्यंत प्रत्येक बाबतीत रणबीरनं कैक बारकावे टीपले होते. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षक आणि समीक्षकांचीही पसंती मिळाली होती. याच काळात या दोन्ही कलाकारंमधील नातंही आणखी दृढ झालं. 


नात्याचे हेच बंध पाहायला मिळाले, जेव्हा रणबीरनं संजयची भेट घेतली. कॅन्सरची लागण झाल्याची माहिती मिळताच रणबीर आणि आलियानं तडक संजूबाबाचं घर गाठलं. कलाविश्वातून त्याच्या भेटीला जाणारी ही पहिलीच जोडी. एकिकडे संजय दत्त या आजाराशी लढा देत असतानाच दुसरीकडे त्याचे कुटुंबीय मोठ्या धीरानं त्याला आधार देत आहेत. 




संजूबाबाची पत्नी मान्यता हिनंही एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या पतीसाठी प्रार्थना करणाऱ्या, पावलोपावली त्याची साथ देणाऱ्या असंख्यजणांचे मनापासून आभार मानले. शिवाय हा कठीण काळही लवकरच सरेल अशी आशाही व्यक्त केली. तिथं खुद्द संजय दत्तनं परिस्थितीचं गांभीर्य आणि गरज पाहता काही काळासाठी वैद्यकीय कारणांसाठी म्हणून आपण चित्रपट विश्वातून विश्रांती घेत असल्याचं स्पष्ट केलं.