मुंबई : 'बाजीराव-मस्तानी' म्हणा किंवा 'राम-लीला' लगेचच समोर येणारी जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची. रुपेरी पडद्यावर सुपरहिट असणाऱ्या या जोडीने काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. ज्यानंतर आता ते पुन्हा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली होती. पण, आता त्यांच्या चाहत्यांना नाराज करणारी माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ या संपूर्ण वर्षात दीपिका आणि रणवीर यांचा एकही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार नसून कोणताच नवा प्रस्तावही त्यांच्यापर्यंत आलेला नाही, ज्यामध्ये ते एकत्र दिसू शकतील. खरंतर ही बाब अनेकांनाच भुवया उंचावायला भाग पाडत आहे. पण, खुद्द रणवीरनेच 'डीएनए'शी संवाद साधताना याविषयीचा खुलासा केला. 



'माझी पत्नी (दीपिका) आणि मी, आमच्याकडे एकत्र काम करण्यासारखा असा कोणताच चित्रपट सध्यातरी हाताशी नाही. त्यामुळे मी आशा करतो, की कोणी एक निर्माता आमच्यापुढे चांगल्या चित्रपटाचा प्रस्ताव ठेवेल. दीपिकासोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्यासाठी मी फारच उत्सुक आहे', असं तो म्हणाला. 


सध्याच्या घडीला रणवीर 'गली बॉय' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झोय़ा अख्तर दिग्दर्शित या चित्रपटातून तो अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर, दीपिका मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या आयुष्यावर या चित्रपटातं कथानक आधारित आहे.