मुंबई : 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांमध्ये उल्ललेखनीय भूमिका निभावल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग याच्या वाट्याला आणखी एक ऐतिहासिक पट आला आहे. करण जोहरच्या दिग्दर्शनात साकारणाऱ्या 'तख्त' या चित्रपटातून रणवीर झळकणार असून, नुकतंच तो या चित्रपटातून कोणत्या भूमिकेत झळकणार आहे, ही बाब समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीव मसंद यांच्या 'अॅन्यूअल अॅक्टर्स राऊंड टेबल' या कार्यक्रमात गप्पा मारतेवेळी त्यांनी यावरुन पडदा उचलला. रणवीरसह या कार्यक्रमासाठी अभिनेता विकी कौशल, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, आयुषमान खुराना यांचीही उपस्थिती होती. याच कलाकारांच्या उपस्थिती गप्पा रंगलेल्या असताना रणवीर आणि विकीच्या 'तख्त'मधील भूमिकांविषयीची माहिती मिळाली. 


'तख्त'मध्ये मुघलकालीन कथानकाच्या निमित्ताने रणवीर हा दारा शिकोहची व्यक्तीरेखा साकारेल तर, विकी कौशल औरंगजेबाच्या भूमिकेत झळकणार आहे. रणवीर आणि विकीच्या निमित्ताने मुघल साम्राज्यातील दारा आणि औॅरंगजेब या दोन भावांचं नातं उलगडलं जाणार आहे. 


'तख्त'मधून इतरही बरेच प्रसिद्ध चेहरे झळकणार असून, स्टारकास्टमुळे हा चित्रपट घोषणा झाल्या दिवसापासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. करीना कपूर खान, अनिल कपूर, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, भूमी पेडणेकर असा एकंदर कलाकारांचा फौजफाटा करणने 'तख्त'साठी एकवटला आहे. 



'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेलं वृत्त आणि चित्रपट वर्तुळात सुरू असणाऱ्या चर्चांनुसार तख्तमध्ये करिना औरंगजेब आणि दाराची बहीण जाहनाराच्या भूमिकेत दिसेल. तर, अनिल कपूर त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच शहाजहानच्या भूमिकेत झळकणार आहेत. आलिया यामध्ये दाराची पत्नी साकारणार आहे, तर भूमी औरंगजेबच्या पत्नीची भूमिका साकारेल. जान्हवी कपूर या चित्रपटात एका गुलाम मुलीची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा आहेत. 'तख्त'मधील ही सर्व पात्र आणि ती साकारण्यासाठी निवड करण्यात आलेले कलाकार पाहता बॉक्स ऑफिसचं तख्त राखण्यात तो यशस्वी ठरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.