`काही पुरुष माझ्याजवळ आले अन्....`, रवीना टंडनने सांगितला सगळा घटनाक्रम; पोस्ट शेअर करत म्हणाली, `वांद्र्यात...`
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून चाहत्यांची माफी मागितली आहे. आपण नेमक्या कोणत्या कारणांमुळे घाबरलो होतो याची माहिती त्यांनी दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) आपण एकटं असताना कोणी फोटोसाठी विनंती करत आलं तर फार भिती वाटते असा खुलासा केला आहे. वांद्रे येथील घटनेनंतर आपल्या मनात अशी भिती निर्माण होण्यास सुरुवात झाली असल्याचं रवीनाने सांगितलं आहे. रवीना टंडनने एक्सवर पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितली असून, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
"नमस्कार, मला फक्त हे रेकॉर्डवर आणायचं आहे. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये मी चालत असताना काही पुरुष माझ्याजवळ आले. मी येथील गुन्हेगारी घटनांबद्दल फार काही चांगलं ऐकलेलं नाही, यामुळे मी थोडी माघार घेतली. त्यांनी मला आम्हाला ज्या वाटत आहात त्याच तुम्ही आहात का असं विचारलं असता माझ्या मनात मी एकटी असल्याने नाही म्हणत वेगाने चालत जाण्याचा विचार आला. त्यांना कदाचित फक्त फोटो हवा होता, ज्यासाठी अनेकदा मी नकार देत नाही," असं रवीनाने सांगितलं आहे.
वांद्रे येथील घटनेनंतर आपल्या मनात भिती निर्माण झाली असल्याचंही रवीनाने सांगितलं. ती म्हणाली की, "वांद्रे येथे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर मी आता थोडी घाबरलेली असते. जेव्हा मी लोकांसोबत असते तेव्हा काही वाटत नाही, पण जेव्हा एकटी असते तेव्हा मात्र भिती असते".
आपण त्या निष्पाप चाहत्यांना फोटो द्यायला हवा होता अशी खंत रवीनाने मांडली आहे. पण मी घाबरले आणि वेगाने चालत सुरक्षारक्षकाकडे मदत मागितली असं रवीनाने सांगितलं. "मला या घटनेनंतर फार वाईट वाटत असून, जर ते वाचत असतील तर या माध्यमातून माफी मागायची आहे. माझी तुमचा अपमान करण्याची इच्छा नव्हती. मला माफ करा. आशा आहे की, आपण पुन्हा भेटू आणि त्यावेळी फोटो काढू. मी सहज आणि सर्वांना उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न करत असते. पण कधीकधी मी अपयशी होते. मला माफ करा. तुम्ही हे आता वाचत असाल अशी आशा आहे. मी घाबरायला नको होतं," अशी कबुली रवीनाने दिली आहे.
रवीना सध्या 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तिच्यासह या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलीन फर्नाडिस, परेश रावल आणि इतर अभिनेते आहेत.