मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी अखेर त्यांच्या आजारपणाविषयीचीह महत्त्वाची माहिती सर्वांसमोर उघड केली आहे. साधारण गेल्या वर्षी कपूर यांना दुर्धर आजाराने ग्रासल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. ज्यानंतर ते उपचारासाठी परदेशी रवाना झाले. एकिकडे ते आजारपणावर उपचार घेत असतानाच दुसरीकडे त्यांच्या कुटुंबीयांकडून मात्र या अडचणीच्या प्रसंगाची कोणतीच वाच्यता माध्यमांसमोर केली गेली नाही. आता 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द कपूर यांनीच आजारपणाच्या काळावरुन पडदा उचलला आहे. '


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि दिलेल्या सदिच्छांबद्दल मी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांचे आभार मानतो. आता मी पूर्णपणे बरा झालो आहे. कॅन्सरही पूर्णपणे नाहीसा होत आहे. असं असलं तरीही उपचाराची काही सत्र अद्यापही सुरुच आहेत', असं ते म्हणाले. उपचारपद्धतीत काहीच अडचणी नाहीत, पण अडचणी आहेत ते म्हणजे त्याला दिल्या जाणाऱ्या प्रतिसादामध्ये, असं म्हणत त्यांनी उपचाराविषयीही माहिती दिली. 


उपचाराचं एक सत्र पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये जवळपास सहा आठवड्यांचा कालावधी असतो. त्यामुळे दुसऱ्या सत्रापर्यंतच्या मधल्या मोकळ्या वेळात तुम्ही खाणं, फिरणं, खरेदीसाठी बाहेर जाणं आणि सर्वसामान्य जीवन जगणं याव्यतिरिक्त काहीच करु शकत नाही. हे सारं न्यूयॉर्कमध्ये करण्यापेक्षा, तर मी माझ्या स्वत:च्या घरी राहूनही करु शकत होतो.... आता या साऱ्याला ९ महिने आणि ११ दिवस झाले आहेत. मला घराची फार आठवण येत आहे', असं ते आयएएनएसशी संवाद साधताना म्हणाले. 


अतिशय कठिण अशा या प्रसंगात आपली पत्नी, मुलं, बहिण आणि मित्रपरिवाराचा आधार मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचेच आभार मानले. आपला कॅन्सर बरा झाला असून, आता फक्त काही दिवसांचा उपचार शिल्लक असल्याचं सांगत येत्या काही दिवसांमध्ये लवकरच आपण मायदेशी परतणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 


आजारपणाच्या काळात आपली भेट घेण्यासाठी ज्या व्यक्ती येत होत्या, त्या काही फोटो पोस्ट करत होत्या, ज्यामुळे चाहत्यांना ऋषी कपूर कसे आहेत याचीही माहिती मिळत होती, असं म्हणत अफवांना शह देण्याची शक्कल त्यांनी सर्वांसमोर मांडली. उपचाराच्या या संपूर्ण काळात ऋषी कपूर यांनी जवळपास २६ किलो वजन कमी केलं. सध्याच्या घडीला त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहेत. पण, तरीही आपण पूर्वी होतो तसे होणार नाही, असा खुलासाही त्यांनी केला. शिवाय आरोग्यातील या सकारात्मक बदलासाठी त्यांनी देवाचे आभारही मानले.