सलमानचं घर बॉम्बने उडवण्याची धमकी
`बचा सकते हो तो बचा लो.`
मुंबई : अभिनेता सलमान खान याचे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात असंख्य चाहते आहेत. अबालवृद्धांच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता सध्या मात्र एका भलत्याच प्रसंगाचा सामना करत असल्याचं चिन्हं आहे. हा प्रसंग भलताच असण्याचं कारण म्हणजे, गाजियाबाद येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने थेट सलमानचं मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट हे घर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांना ई-मेलच्या माध्यमातून त्याने सलमानच्या घरात बॉम्ब असल्याचं म्हटलं. इतकंच नव्हे, तर या मेलमध्ये त्याने 'बचा सकते हो तो बचा लो', असंही लिहिलं.
संपूर्ण तपासणीनंतर मुंबई पोलीस गाजियाबाद येथे पोहेचली तेव्हा मेल करणारा मुलगा अल्पवयीन असल्याचं त्यांच्या लक्षात आलं, ज्यानंतर त्याला वांद्रे येथे हजर होण्यास सांगण्यात आलं. गाजियाबाद पोलिसांच्या माहितीनुसार याच अल्पवयीन मुलाने यंदाच्याच वर्षी जानेवारी महिन्यातसुद्धा अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. त्यावेळी या मुलाला पोलिसांनी ताकीद देऊन सोडलं होतं.
दरम्यान, सलमानचं घर बॉम्बने उडवण्याचा मेल या मुलाने ४ डिसेंबरला पाठवला होता. 'वांद्र्यातील गॅलेक्सी येथे सलमानच्या घरी पुढील दोन तासांमध्ये स्फोट होणार आहे', असं लिहिण्यात आलेल्या त्या मेलमध्ये 'रोक सको तो रोक लो' असंही म्हटलं गेलं होतं. ज्यानंतर हा मेल मिळताच पोलिसांनी सलमानच्या संपूर्ण घराची तपासणी केली. पुढे पोलिसांनी या मुलाला शरणागती पत्करण्याची नोटीस पाठवत त्याला जुवेनाइल न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला सोडण्यातही आलं.
Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच
पोलीस पहारा आणि सुरक्षेच्या सर्व निकषांची पडताळणी केल्यानंतरही अशा प्रकारे देण्यात येण्याचा हा प्रकार काही नवा नाही. यापूर्वीही काही सेलिब्रिटींना अशा प्रकारची धमकी देण्यात आली होती. अशा धमक्या देणाऱ्यांवर आता पोलीस यंत्रणाही करडी नजर ठेवून आहेत.