मुंबई : 'यारों का यार' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान येत्या काळात पुन्हा एकदा त्याच्या आणखी एका मित्राच्या मदतीसाठी धावला आहे. बऱ्याच नव्या चेहऱ्यांनी हिंदी कलाविश्वात पदार्पण करण्यासाठी मदत करणारा भाईजान सलमान आता महेश मांजरेकर यांच्या मुलीला, अश्वमीलाही या कलाविश्वात लाँच करणार असल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुंबई मिरर'शी संवाद साधत खुद्द मांजरेकर यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला. 'हो.... सलमान माझ्या मुलीला या कलाविश्वात पदार्पणासाठी मदत करणार आहे', असं त्यांनी स्पष्ट केलं. सोबतच यासाठी काही कालावधीही जाणार असल्याची कल्पना त्यांनी दिली. यावेळी मांजरेकर यांनी सलमानच्या स्वभावाविषयी सांगत नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी धावून जाण्याचा त्याच्या स्वभावाचीही प्रशंसा केली. 


मांजरेकर आणि सलमान यांच्यातील मैत्री ही कलाविश्वासाठी नवी नाही. काही चित्रपटांमध्येही त्यांनी एकत्र काम केलं आहे. त्यामुळे आपल्या या मित्राची मदत करण्यासाठीही सलमान खऱ्या अर्थाने धावला आहे असं म्हणायला हरकत नाही. सूरज पांचोली, डेझी शाह, सोनाक्षी सिन्हा, आयुष शर्मा आणि अशा बऱ्याच कलाकारांच्या यादीत आता मांजरेकरांच्या मुलीचा म्हणजेच अश्वमीचाही समावेश होणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. 


अश्वमी नेमकी कोणत्या भूमिकेत, कोणत्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल असाच प्रश्न आता अनेकांनी उपस्थित केला आहे. पण, वेळच याचं उत्तर देऊ शकेल. त्यामुळ आता तिच्या पदार्पणाचीच वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हेही तितकच खरं. पण, मांजरेकर आणि सलमानचं नातं पाहता एखाद्या तगड्या प्रोजेक्टमधून अश्वमी पदार्पण करु शकेत ही शक्यता नाकारता येत नाही.