कॅन्सरवर नक्कीच मात करेन; नव्या लूकसह संजूबाबाचा व्हिडिओ व्हायरल
या आजाराशी झुंजताना हीच सकारात्मकता आवश्यक आहे
मुंबई : अभिनेता संजय दत्त sanjay dutt याला कॅन्सरचं cancer निदान झाल्यानंतर चाहत्यांनी या लाडक्या अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यातच काही दिवसांपूर्वी त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये संजय दत्तची तब्येत अनेकांनाच चिंतातूर करुन गेली. पण, आता मात्र ही चिंता काहीशी दूर होत आहे. कारण, खुद्द संजूबाबानंच आपण या आजावर नक्कीच मात करु, असं म्हणत सर्वांनाच विश्वास दिला आहे.
नेहमीच आपल्या अनोख्या आणि तितक्या लक्षवेधी अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या संजय दत्त यानं कॅन्सरवरील उपचार सुरु असताना एक नवा लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. नव्या हेअरस्टाईलसह संजूबाबा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तोसुद्धा अतिशय सकारात्मकतेनं.
सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हकीमनं सोशल मीडियावर संजय दत्तसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये त्यानं संजूबाबाला एक नवा लूक दिल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे हा लूक बी- टाऊनच्या या 'मुन्नाभाईला चांगलाच शोभूनही दिसत आहे.
आपल्या या नव्या लूकबाबत आणि आलीमसोबतच्या नात्याबाबत संजय दत्त या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत असून, आपण या आजारावर लवकरच आणि नक्कीच मात करु असं मोठ्या आत्मविश्वासानं म्हणत आहे. इतकंच नव्हे तर, लॉकडाऊनच्या दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा केशकर्तनालयं सुरु होण्याबाबतचा आनंदही त्यानं व्यक्त केला आहे. सोबतच यादरम्यानच्या काळात बराच वेळ घरात बसून काढला, पण आता सर्व सावधगिरी बाळगत थोडं बाहेर पडा असा संदेश तो सर्वांना देत आहे. या व्हिडिओमध्ये संजूबाबाचा तोच 'बोलेतो....'वाला अंदाज पाहून चाहत्यांनाही आनंद झाला आहे.