वाईट! मद्यधुंद अवस्थेत संजय दत्त `या` अभिनेत्रीमागं चाकू घेऊन धावलेला आणि...
Entertainment News : कलाकार आणि त्यांच्या जीवनातील काही किस्से कायमच चर्चेत येतात. पण, प्रत्येक वेळी हा किस्सा सकारात्मकच असेल असं नाही.
Entertainment News : एखादा कलाकार जेव्हा मोठा होतो, प्रसिद्धीझोतात येतो तेव्हा त्या कलाकाराच्या अवतीभोवती अशा काही चर्चा रंगण्यास सुरुवात होते ज्या चर्चांचा थेट संबंध कलाकारांच्या खासगी आयुष्याशी असतो. कारण, अजाणतेपणानं बरच काही घडून गेलेलं असतं जे वारंवार विविध कारणांनी प्रकाशात आणलं जातं आणि पुन्हापुन्हा त्या कलाकारांची नावं चर्चांमध्ये येतात आणि तिथंच राहतात.
अभिनेता संजय दत्त हासुद्धा अशाच कलाकारांमधील एक. व्यक्ती म्हणून संजूबाबा अनेकांच्याच आवडीचा. पण, याच संजूबाबानं खासगी जीवनात पाहिलेले चढऊतार मात्र कोणीही नाकारू शकत नाही. कारकिर्दीत आलेल्या यशापयशासोबतच संजूबाबा कायमच त्याच्या खासगी आयुष्यामुळं नजरा वळवताना दिसला. मग ती त्याची प्रेमप्रकरणं असो किंवा नशेच्या आहारी जाण्याचा जीवनातील एक नकोसा काळ असो. (Bollywood actor Sanjay Dutt)
नशेच्या आहारी गेलेला संजय दत्त...
काही वर्षे मागं गेलं असता संजय दत्तच्या जीवनातील एक असा काळ समोर येतो जो त्याच्यासाठी आणि कुटुंबासाठीही आव्हानात्मकच होता. खुद्द अभिनेत्यानंच एक मुलाखतीत याचा खुलासा केला होता. या काळात संजय दत्त नशेच्या आहारी गेला होता, तो सतत नशेतच राहत होता. दरम्यानच 'विधाता' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान असं काही घडलं की आपण जे काही केलं यावर त्याचाही विश्वास बसेना!
झालं असं की...
चित्रपट निर्मात्यांनी त्यावेळी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. जिथं दिग्दर्शक, कलाकार या सर्वांचीच हजेरी होती. संजय दत्त तिथं आला. पण, तो फारच उशिरा तिथं पोहोचला होता. बरं, तो नशेतच होता. पार्टीमध्ये येताच त्यानं हातात चाकू घेतला आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेच्या दिशेनं तो गेला.
हेसुद्धा वाचा : पायीच फिरता येतो 'हा' संपूर्ण देश; महिलांच्या हाती का असतात बंदुका?
संजयला थांबवणं अशक्य होतं. त्याला या अवस्थेत पाहून पद्मिनीसुद्धा घाबरली आणि भीतीपोटी किंकाळ्या फोडू लागली होती. बरं इतक्यावरच न थांबता तो चाकू घेऊन तिच्यामागं धावू लागला. बऱ्याच प्रयत्नानंतर कसाबसा त्याच्यावर ताबा मिळाला आणि परिस्थिती आटोक्यात आली. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ही सर्व माहिती संजय दत्तचे वडील अभिनेते सुनील दत्त यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा मुलामुळं त्यांची बरीच नाचक्की झाली होती.