...अन् यश चोप्रांच्या आठवणीने शाहरुख गहिवरला
कोणा एका चाहत्याने....
मुंबई : काही व्यक्ती या त्यांच्या कार्यामुळे आणि अमुक एका क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे कायमच स्मरणात राहतात. बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रासुद्धा यापैकीच एक. कलाविश्वात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि किंग खान, म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याच्यासाठी आदर्शस्थानी असणाऱ्या यश चोप्रा यांच्या कलाकृती आजही तितक्याच लोकप्रिय. ते आज आपल्यात नसले तरीही चित्रपटांमधून त्यांचं अस्तित्वं कायमच आहे. अचानकच यश चोप्रा यांच्याविषयीच्या चर्चा होण्याचं कारण म्हणे शाहरुखने केलेली एक पोस्ट.
एक व्हायरल व्हिडिओ शेअर करत शाहरुखने त्यासोबत लिहिलेलं कॅप्शन पाहता यश चोप्रा यांच्या आठवणीने तो गहिवरल्याचं कळत आहे. कोणा एका चाहत्याने एका व्हारल व्हिडिओच्या पोस्टमध्ये शाहरुखला टॅग केलं. या व्हिडिओमध्ये परदेशात एक कलाकार रस्त्यावरुन जाणाऱ्या वाटसरुंसमोर 'तुझे देखा तो ये जाना सनम' या गाण्याची धुन बासरीवर वाजवताना दिसत आहे. इतकच नव्हे, तर तो हे गाणं गुणगुणतानाही दिसत आहे.
वाटसरुंसमोर आपली कला सादर करणाऱ्या या कलाकाराचा एकंदर अंदाज आणि मुख्य म्हणजे त्याच्या डोक्यावर असणारी टोपी पाहून शाहरुखला एकाएका यश चोप्रा यांचीच आठवण झाली. डोक्यावर टोपी घातलेला यश चोप्रा यांचा चेहरा अनेकांच्याच डोळ्यांसमोर आहे. खुद्द शाहरुखलाही ते विसरु शकलेला नाही.
यश चोप्रा आणि किंग खान हे कलाविश्वातील एक असं समीकरण आहे जे अवघ्या काही शब्दांमध्ये मांडता येणं कठीणच. 'डर', 'वीर- झारा', 'दिल तो पागल है' आणि 'जब तक है जान' यांसारख्या चित्रपटांतून या जोडीने काम केलं आहे. त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना, 'एका निर्भीड दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं...' असं शाहरुख म्हणाला होता.