मुंबई: काही गायक आणि अभिनेते, अभिनेत्रींचं गणित असं काही सुरेखरित्या जमूज जातं की त्याला कशाचीही तोड नसते. अशाच काही अफलातून जोड्यांमधील  एक नाव म्हणजे अभिनेता शाहरुख खान आणि पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य. 'तौबा तुम्हारे ये इशारे..' हे गाणं कुठे बाजलं की लगेचच अभिजीत भट्टाचार्यचा आवाज रसिकांच्या कानात घुमू लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा गायक गेल्या काही दिवसांपासून मात्र त्याच्या बेताल वक्तव्यांमुळेच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. 


सध्याच्या घडीला अचानकच तो प्रकाशझोतात येण्यामागचं कारण म्हणजे त्याचं असंच एकत वक्तव्य. 


'इंडिया टुडे'ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलतेवेळी त्याने आता आपण शाहरुख खानसाठी का गात नाही, या प्रश्नाचं उत्तर दिलं .  


'माझ्या आवाजामुळेच लोक सुपरस्टार होतात. मी शाहरुखसाठी गात होतो तोवर तो रॉकस्टार होता. पण, मी त्याच्यासाठी गाणं थांबवलं तेव्हापासून त्याचा स्तर थेट लुंगी डान्सपर्यंत पोहोचला', असं अभिजीत म्हणाला. 


शाहरुखसाठी आपण पार्श्वगायन करत नसल्याचं कारण देत अभिजीत म्हणाला की, 'मै हूँ ना' या चित्रपटच्या वेळी शेवटी सर्वांनाच अगदी स्पॉटबॉयनाही पडद्यावर दाखवण्यात आलं पण, या साऱ्यांमध्ये मी कुठेच नव्हतो. अर्थात असं होण्याची ती पहिलीच वेळ होती, त्यामुळे मी गोष्टी विसरलो होतो', असं त्याने स्पष्ट केलं. 


जो प्रकार 'मै हूँ ना'च्या वेळी घडला होता तोच 'ओम शांति ओम' या चित्रपटाच्या वेळीही घडला, ज्यामुळे आपला स्वाभिमान दुखावला गेल्याचं त्याने नमूद केलं. या चित्रपटात त्याने 'धुम ताना' हे गाणं गायलं होतं. 


आपण स्वत:हून एखाद्या गोष्टीचं श्रेय मागून का घ्यावं, आपलं नाव चित्रपटात देण्याची विचारणा का करावी असे प्रश्न उपस्थित करत माझ्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही असं म्हणत एक प्रकारे त्याने खंत व्यक्त केली. 


मुख्य म्हणजे आपल्या आवाजामुळेच काही चेहरे सुपरस्टार झाले असं म्हणणाऱ्या अभिजीतने आपण ज्यांच्यासाठी गायलो नाही, ते कधीच प्रसिद्धीझोतात आले नाहीत हा निष्कर्षही मांडला. 


अभिजीतचं हे वक्तव्य पाहता आता फराह खान, शाहरुख खान यावर काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.