कॅन्सरविषयी शाहिदचं `हे` विधान
आपल्या प्रकृतीविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा आणि एकंदरच चाहत्यांमध्ये असणारं भीतीचं वातावरण पाहता अखेर...
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या एका विचित्र कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आता अभिनेता शाहिद कपूर यालाही या आजाराचं निदान झाल्याच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आलं आहे.
आपल्या प्रकृतीविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा आणि एकंदरच चाहत्यांमध्ये असणारं भीतीचं वातावरण पाहता अखेर खुद्द शाहिदनेच याविषयीचं मौन सोडलं आहे. मी पूर्णपणे बरा असून, कृपा करुन कोणत्याची अफवांवर विश्वास ठेवू नका, असं म्हणत सर्व चित्र स्पष्टपणे सर्वांसमोर मांडलं आहे.
शाहिने केलेलं हे ट्विट पाहून चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. एका संकेतस्थळाने बी- टाऊनच्या या लोकप्रिय अभिनेत्याचा पोटाचा कॅन्सर असल्याचं वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलं.
शाहिदच्या कुटुंबीयांनीही त्याला असा कोणत्याच प्रकारचा आजार न झाल्याचं सांगत गोष्टी स्पष्ट केल्या. पण, अखेर परिस्थितीचं गांभीर्य पाहता खुद्द शाहिदनेच या अफवांना पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्य़ा शाहिद त्याच्या काही खासगी कामांसाठी दिल्लीला गेला होता. पण, आता तो लवकरच मुंबईत परत येणार असल्याची माहिती त्याच्या मॅनेजरकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आतातरी त्याच्या या आजारपणाविषयीच्या अफवांना पूर्णविराम मिळेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.