बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इश्क विश्क' या चित्रपटातून शाहिदने सिनेसृष्टीत पदार्पण केले. शाहिद हा गेल्या 20 वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहे. शाहिदला 'रोमँटिक हिरो', 'चॉकलेट बॉय' या नावाने विशेष ओळख मिळाली. पण त्यानंतर त्याने अनेक नकारात्मक पात्र साकारले. त्याची 'कबीर सिंग' या चित्रपटातील भूमिका विशेष गाजली. आता शाहिदने 'चॉकलेट बॉय' ही ओळख आवडत नसल्याचा खुलासा केला आहे. 


'मला पराभवही मंजूर'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद कपूरने बॉलिवूड हंगामाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत शाहिद कपूरने त्याच्या करिअरबद्दल भाष्य केले. यावेळी शाहिद म्हणाला, "मला सतत एखादी गोष्ट करणं आवडत नाही. मला प्रत्येक वेळी काही तरी नवीन करायचे असते. मला आव्हान स्वीकारायला आवडतात. हे सर्व कसं होईल, याची मला माहिती नाही. मला पराभवही मंजूर असतो. मला त्यात काहीही हरकत नाही. कारण त्यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळतात." 


"सध्या सिनेसृष्टीत लोक फार कमी वेळेसाठीचा विचार करतात. प्रत्येकाकडे पुढच्या दोन-तीन वर्षांसाठीचा प्लॅन असतो. पण तुमची वाढ तेव्हाच होते, जेव्हा तुम्ही यापूर्वी केलेल्या गोष्टी करत नाही", असे शाहिद यावेळी म्हणाला.



'सतत क्लीन शेव करुन तेच तेच करायचे नव्हते'


या मुलाखतीवेळी त्याला 'इश्क विश्क' या चित्रपटामुळे तुला 'चॉकलेट बॉय' ही ओळख मिळाली, याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, "मला चॉकलेट बॉय ही ओळख मिळाली, याचं खूप वाईट वाटतं. कारण या प्रतिमेमुळे मला कुठे ना कुठे तरी मर्यादित झाल्यासारखं वाटतं. जेव्हा मी इश्क विश्क हा चित्रपट केला, त्यानंतर चॉकलेट बॉय हा शब्द माझ्याशी जोडला गेला. चॉकलेट बॉय या शब्दाचा नेमका अर्थ काय, याचा मी विचार करत होतो." 


"मी एक कलाकार आहे. चांगले दिसणे, चांगले कपडे परिधान करणे यासारख्या गोष्टी फक्त दिखाव्यासाठी असतात.  त्यामुळे मी स्वत:ला पूर्णपणे बदलले. कारण मला सतत क्लीन शेव करुन तेच तेच करायचे नव्हते", असे शाहिद कपूर यावेळी म्हणाला.


दरम्यान शाहिद कपूर हा सध्या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो लवकरच तेरी बातों मे ऐसा उलझा जिया या चित्रपटात झळकणार आहे. यात तो क्रिती सेनॉनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट येत्या 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.