मुंबई : काही कलाकार हे त्यांच्या रुपेरी पडद्यावरच्या कारकिर्दीपेक्षा पडद्यामागच्या त्यांच्या स्वभावासाठी ओळखले जातात. तर, काही कलाकार मात्र दोन्ही ठिकाणी आपली दमदार कामगिरी दाखवत असतात. अशा या दुसऱ्या पद्धतीचाच एक चेहरा म्हणजे अभिनेते शम्मी कपूर. कपूर कुटुंबाचा वरदहस्त असणाऱ्या या अभिनेत्याची ओळख डान्सिंग स्टार, रॉकस्टार अशीही सांगितली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी चित्रपटांमध्ये आपली वेगळी शैली दाखवत त्या बळावर लोकप्रिय झालेला हा अभिनेता. शमशेर राज कपूर, असं त्यांचं पूर्ण नाव. जंगली, काश्मीर की कली या चित्रपटांनी शम्मी यांना लव्हरबॉय म्हणून प्रसिद्ध केलं. (Shammi Kapoor)


शम्मी कपूर हे त्यांच्या मनमिळाऊ अंदाजासाठीही ओळकले गेले. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगावं, तर गीता बाली या त्यांच्या पहिल्या पत्नी. 'रंगीन राते' या चित्रपटाच्या वेळी या दोघांची पहिली भेट झाली होती. या चित्रपटात शम्मी कपूर मध्यवर्ती भूमिकेत होते, तर गीता बाली पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होत्या. पहिल्याच भेटीत शम्मी कपूर गीता बाली यांच्यावर भाळले होते. पुढे जाऊन त्यांनी प्रेमाची कबुली दिली आणि लगेचच या दोघांनी विवाहबंधनात अडकत नव्या प्रवासाची सुरुवात केली. शम्मी कपूर आणि गीता बाली यांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरु असतानाच नात्यावर काळानं घाला घातला. गीता बाली यांचं निधन झालं.


गीता बाली यांच्या निधनानंतर शम्मी कपूर यांना जबर हादरा बसला होता. पण, कुटुंबाचा दबाव आणि मुलांच्या भल्यासाठी म्हणून त्यांनी नीला देवी यांच्याशी दुसरं लग्न केलं. असं म्हटलं जातं की नीला देवी आणि शम्मी यांचं लग्न झालं खरं, पण त्यांनी लग्नाच्या वेळी मोठं वचन नीला यांच्याकडून घेतलं होतं. आपली स्वत:ची मुलं होऊ न देता, शम्मी आणि गीता यांच्याच मुलांचा आई म्हणून सांभाळ करण्याचंच ते वचन होतं. नीला यांनीही हे वचन स्वीकारलं आणि शम्मी यांना साथ दिली. 


 


शम्मी यांचं पहिलं नातं हे प्रेमाच्या बळावर उभं होतं, तर त्यांचं दुसरं नातं हे विश्वासाच्या बळावर उभं राहिलं आणि विस्तारलं. या नात्यानं अनेकांसाठीच आदर्स घालून दिला. सोबत असणाऱ्या व्यक्तीखातर त्याग करताना कुठेही स्वार्थ नसावा, हाच धडा या नात्यानं दिला.