मुंबई : coronavirus कोरोना व्हायरसमुळं लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि पाहता पाहता अनेक व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यांच्या, राज्यांच्या सीमा बंद झाल्या आणि खऱ्या अर्थानं जनजीवन विस्कळीत झालं. या साऱ्या वातावरणामध्ये समाजातील एका अत्यंत दुर्बल तसंच या परिस्थितीपुढं हात टेकलेल्या वर्गाला नेमकी वाट दिसत नसतानात आशेचा किरण घेऊन आला अभिनेता सोनू सूद sonu sood. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी म्हणून सोनूनं जबाबदारीनं पुढं येत अनेकांना सुखरुपपणे त्यांच्या घरी पाठवलं. प्रवासादरम्यान त्यांच्या सुरक्षिततेपासून ते अगदी खाण्यापिण्याच्या सोयीपर्यंत प्रत्येत गोष्टीची त्यानं काळजी घेतली. सर्वत्र आपल्या या नि:स्वार्थ कामानं अनेकांच्या मनात आदराचं स्थान मिळवणाऱ्या या बॉलिवूडकरानं आता पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 


सोनू यावेळी चक्क कोकणच्या, गावाच्या दिशेनं निघालेल्यांच्या मदतीसाठी पुढं आला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं गावाकडे जायचं कसं असाच प्रश्न अनेक चाकरमान्यांना पडला होता. ज्यानंतर शासनानं काही नियम आखून देत गावाला जाण्याची वाट त्यांना मोकळी करुन दिली. पण, यातही अनेकांनाच काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी म्हणून एका व्यक्तीनं सोशल मीडियाचा आधार घेत थेट सोनू सूदशी संपर्क साधला. 


'आमचा सण जवळ येत आहे आणि ट्रॅव्हलर्स सेवा देणारे मुंबईपासून मालवणापर्यंत जाण्यासाठी माणसी ३ हजार रुपये आकारत आहेत. एरव्ही हे दर ५०० रुपये असतात. शिवाय ते ई पाससाठीसुद्धा जास्तीचे ५०० रुपये मागत आहेत. सोनू सूद, तुम्ही आम्हाला गणेशोत्सवासाठी जाण्यास मदत करु शकाल का?', असा प्रश्न निखिल परब या युजरनं विचारला. त्याच्या या ट्विटला उत्तर देत सोनूनं लगेचच मदतीचा हात पुढं केला. 




'कोणालाही कोणत्याही प्रकारे पैसे देण्याची गरज नाही. मला तुमची माहिती पाठवा....गणपती बाप्पा मोरया', असं लिहित सोनूनं नव्या पद्धतीनं मदत करण्याचा श्रीगणेशा केला. तेव्हा आता खऱ्या अर्थानं गणेशोत्सवासाठी गावाकडे निघालेल्यांची सोनूक काळजी रं.... असं म्हणायला हरकत नाही.