सुशांतचा आणखी एक Unseen व्हिडिओ व्हायरल
पाहा या व्हिडिओमध्ये नेमकं कोण कोण आहे
मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दर दिवशी नवी माहिती समोर येऊन अनेकांना थक्क करत आहे. याच माहितीच्या ओघात सध्या एक व्हिडिओही कमालीचा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे, कुटुंबासमवेत काही महत्त्वपूर्ण आणि खास क्षण व्यतीत करणाऱ्या सुशांतचा.
२०१९ या वर्षाच्या अगदी सुरुवातीच्याच काळात चित्रीत केलेल्या या व्हिडिओमध्ये सुशांत त्याच्या घरी रुद्राभिषेक पूजा करताना दिसत आहे. कॅप्री हाईट्स या इमारतीतीत हे सुशांतचं घर असल्याचं कळत आहे. वांद्रे येथे राहण्यास जाण्यापूर्वी तो याच घरी राहत होता, अशीही माहिती समोर येत आहे. या घरानंतर सुशांत वांद्रे येथील माँट ब्लँक अपार्टमेंट येथे वास्तव्यास गेला होता.
सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये सुशांतची बहीण आणि तिचा पतीसुद्धा दिसत आहे. खुद्द सुशांतच्या बहिणीनंच सुशांतच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा व्हिडिओ शेअर केला होता. रिया या पूजेचा भाग नव्हती अशीही माहिती समोर येत आहे. घराच्या भरभराटीसाठी करण्यात आलेल्या पूजेमध्ये सुशांत, त्याची बहीण आणि बहिणीचा पती यांच्यासह सुशांतसोबत काम करणाऱ्या मंडळींचा सहभाग होता.
कारकिर्दीमध्ये यशाच्या शिखरांवर पोहोचणाऱ्या अतिशय हरहुन्नरी आणि बुद्धीमान अशा या अभिनेत्यानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या करत जीवन संपवलं होतं. सुशांतच्या जाण्यानं संपूर्ण कलाविश्वालाच हादरा बसला होता. ज्यानंतर बऱ्याच प्रश्नांनी डोकं वर काढलं. हे प्रश्न पाहता आता सीबीआयकडून या प्रकरणीचा तपास सुरु असून, सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे.