वरुण धवन लवकरच होणार बाबा, पत्नीसोबतचा खास फोटो पोस्ट करत दिली गुडन्यूज
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता वरुण धवन लवकरच बाबा होणार आहे. त्याने पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे
Varun Dhawan-Natasha Dalal Pregnancy : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. वरुण धवन हा लवकरच बाबा होणार आहे. त्याने नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोठी गुडन्यज दिली आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल हे दोघेही 2021 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या तीन वर्षानंतर वरुण धवन आणि नताशा हे दोघेही आई-बाबा होणार आहेत.
वरुण धवनने दिली गुडन्यूज
वरुण धवन आणि नताशा हे दोघेही बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. वरुण धवन आणि नताशा हे कायमच त्यांचे वैयक्तिक आयुष्य मीडियापासून दूर ठेवतात. पण आता वरुणने त्याच्या आयुष्यातील मोठी गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. वरुणने काही मिनिटांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने पत्नी नताशा दलालसोबतचा ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत वरुण हा पत्नी नताशाच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे.
पोस्टला दिले हटके कॅप्शन
या पोस्टला त्याने फारच सुंदर कॅप्शनही दिले आहे. "वी आर प्रेग्नेंट, आम्हाला तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे", असे वरुण धवनने म्हटले आहे. त्याबरोबर त्याने "माझे कुटुंब माझी ताकद" असा हॅशटॅगही शेअर केला आहे. वरुणच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करत त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
वरुणने तो बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिल्यानंतर सानिया मिर्झाने त्याच्या पोस्टवर कमेंट केली आहे. सानियाने 'अभिनंदन' असे म्हटले आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा प्रभूने 'खूपच छान बातमी' असे म्हणत यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर अर्जुन कपूरने 'आई आणि बाबा एक नंबर' असे म्हणत कमेंट केली आहे. त्याबरोबरच मलायका अरोरा, धर्मेश, झारा खान, सोफिया चौधरी, रेमो डिझूझा यांसारख्या अनेक कलाकारांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
वरुण धवनने 2021 मध्ये बांधली लग्नगाठ
दरम्यान वरुण धवन हा 24 जानेवारी 2021 रोजी विवाहबंधनात अडकला. वरुणने त्याची बालमैत्रीण नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधली. वरुण आणि नताशा यांचे लग्न अलिबागच्या द मॅन्शन रिसॉर्टमध्ये पार पडले होते. या सोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र-मंडळी उपस्थित होते. वरुण आणि नताशा बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.