`तख्त`मधील औरंगजेबाच्या भूमिकेविषयी विकीचा महत्त्वाचा खुलासा
करण जोहर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
मुंबई : 'मसान' या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे अभिनेता विकी कौशल प्रेक्षकांच्या नजरेत आला होता. पण, खऱ्या अर्थाने या अभिनेत्याला बॉक्स ऑफिस आणि संपूर्ण बॉलिवूड विश्वात प्रकाशझोतात आणलं ते म्हणजे 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाने. २०१९ या वर्षाची मोठ्या दणक्यात सुरुवात करत विकी कौशल याने आपल्या अभिनय कलेची छाप पाडत अनेक कलाकारांच्या स्पर्धेत उडी घेतली.
फक्त 'उरी...'च नव्हे तर, येत्या काळात तो करण जोहरच्या दिग्दर्शनात साकारणाऱ्या तख्त या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून विकी कौशल याच्यासोबतच अभिनेत्री करिना कपूर खान, आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर, अनिल कपूर आणि रणवीर सिंग हे कलाकारही झळकणार आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटासाठी विकीही प्रचंड उत्सुक आहे. पण, तरीही वाटेत येणाऱ्या काही अडचणींचं आणि आव्हानांचं भय त्यालाही आहे.
मुघलकालीन कथानकावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटातून तो औरंगजेबाच्या भूमिकेत दिसेल. हीच भूमिका साकारण्याविषयीची प्रतिक्रिया त्याने नुकतीच एका मुलाखतीत दिली. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आपण साकारत असणाऱी भूमिका ही पूर्णपणे नकारात्मक असल्यामुळे आता 'तख्त'च्या चित्रीकरणाची वाट पाहत असल्याचं विकी मोठ्या उत्साहात म्हणाला. त्या भूमिकेच्या गरजा फार आहेत आणि एक अभिनेता म्हणून त्याच गोष्टी विकीसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
औरंगजेबाचं पात्र साकारण्यासाठी एखाद्या व्यक्तीविषयी फक्त न बांधता, आणि त्याच्या कृती मनसुब्यांकडेच लक्ष न देता ते पात्र आहे त्याच पद्धतीने स्वीकारत, त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत एखाद्याची देहबोली, भाषा आणि इतर घटकांवर लक्ष देणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असं तो म्हणाला.
रणवीर सिंगने 'पद्मावत' या चित्रपटात साकारलेली अलाउद्दीन खिल्जीची भूमिका आणि त्याने स्थापित केलेला मापदंड पाहता तख्तमधील भूमिका आव्हानात्मक असेल का, असं विचारलं असता विकीने त्याच्या अंदाजात या प्रस्नाचं उत्तर दिलं. चित्रपट कशासंदर्भात आहे आणि त्याच औरंगजेबाची भूमिका नेमकी कशी आहे, हे आपण जाणत असल्याचच तो म्हणाला. त्यामुळे आता विकीचं हे रुप नेमकं कसं असेल हेच पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वातही उत्सुकता पाहायला मिळत आहे.