मुंबई :  हिंदी कलाविश्वात दररोज काही नव्या चित्रपटांच्या चर्चा येतात, अनेक कलाकारांनी या चित्रपटांसाठी निवड केली जाते. काही चर्चा यशस्वी ठरतात तर, काही अयशस्वी ठरतात. अशा या वातावरणात सध्या चर्चा होत आहे ती म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटाची आणि त्यांच्यासोबत झळकणाऱ्या अभिनेत्रीची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डीएनए'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ऐश्वर्या येत्या काळात मणिरत्नम यांच्या एका भव्य कलाकृतीत झळकू शकते. ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या अतिभव्य प्रोजेक्टसाठीचा प्रसाव तिच्याकडे मांडण्यातही आला असून तिच्याकडून जवळपास होकार मिळालाच आहे. 


ऐश्वर्यासोबतच या चित्रपटासाठी तिचे सासरे म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही विचारण्यात आलं आहे. पण, त्यांच्याकडून अद्यापही कोणतच उत्तर मिळालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बरेच प्रसिद्ध चेहऱ्यांची वर्णी या चित्रपटात लागणार आहे. 


'बाहुबली' या चित्रपटाची भव्यता पाहता त्याच धर्तीवर हा ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणारा हा चित्रपट साकारण्यात येणार आहे. एक वर्षाहून अधिक दिवसांपर्यंत हा चित्रपट साकारण्यात येणार असल्यामुळे सुरुवातीलाच कलाकारांकडून त्यांचा जास्तीत जास्त वेळ मागण्यात आला आहे. तेव्हा आता बिग बी मणिरत्नम यांच्या अतिभव्य प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी होकार देणार का, हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांनी या चित्रपटात काम करण्यास होकार दिल्यास सुनेबरोबर म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासोबत तब्बल ११ वर्षांनी ते एकाच चित्रपटात झळकणार आहेत. त्यामुळे सुन आणि सासरेबुवांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार का, याकडेच खुदद् मणिरत्नम आणि चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.