आलियाला दणका; कारकिर्दीत हा दिवसही पाहिला
आलियालाही तिच्या कारकिर्दीच्या दृष्टीनं ....
मुंबई : अभिनयाच्या बळावर 'उडता पंजाब', 'राझी' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधणारी अभिनेत्री आलिया भट्ट सध्या कारकिर्दीतील आव्हानात्मक काळाला सामोरी जात आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'सडक' या चित्रपटावर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्याकडे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ पाहता याचाच अंदाज येत आहे.
महेश भट्ट यांचं दिग्दर्शनातील पुनरागमन आणि खुद्द आलियालाही तिच्या कारकिर्दीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या वाटणाऱ्या 'सडक' या चित्रपटाला आयएमबीडीनं सर्वात कमी रेटींग दिलं आहे. अवघा एक स्टार देत हा चित्रपट नेमका कसा आहे, हे त्यांच्याकडून फार कमी शब्दांत सांगण्यात आलं आहे. 'डिस्ने प्लस हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २८ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनीही स्वीकारलेलं नाही. त्यामुळं कारकिर्दीत यशाच्या शिखरावर असणाऱ्या आलियाला हा दिवसही पाहावा लागलेला आहे.
संपूर्ण कलाविश्वात घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन सुरु असणाऱ्या नकारात्मक वातावरणातच आलियाचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेतार सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्याचा इथंही फटका बसला. कलाकारांची मुलं आणि बाहेरुन कोणाचाही वरदहस्त नसताना या विश्वात पदार्पण करणारे कलाकार असे गट तयार झाले आणि आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु झाली.
बाहेरुन आलेल्या कलाकारांकडे प्रस्थापितांचा पाहण्याचा दृष्टीकोन यामध्ये वादाचा विषय ठरला. इतकंच नव्हे, तर मोठ्या निर्मिती संस्थेकडून सुशांतच्या वाट्याला येणारे एक- दोन नव्हे तर तब्बल सात चित्रपट हिरावले जाणं हे वास्तवही या वादाला खतपाणी देऊन गेलं. याचा थेट फटका सेलिब्रिटी कुटुंबातून येणाऱ्या आलियाच्या 'सडक' या चित्रपटाला बसला.
चित्रपटाबाबत सुरुवातीपासून नकारात्मक सूर आळवला गेल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यामध्ये युट्युबवर चित्रपटाच्या ट्रेलरला सर्वाधिक Dislikes देण्यात आल्या होत्या. म्हणजेच मोठ्या संख्येनं प्रेक्षकांनी ट्रेलरला नापसंती दर्शवली होती.