मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि प्रियकर विकी जैन यांच्या लग्नसोहळ्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मालिका आणि चित्रपट जगतामध्ये आपली छाप सोडत अंकितानं अभिनय क्षेत्रात एक उंची गाठली. ज्यानंतर आता ती लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच तिचा आणि विकी जैन यांचा साखरपुडा झाला. अधिकृतपणे आता त्यांनी या नात्याला एक नवी ओळख दिली आहे. 


अतिशय दिमाखदार अशा सोहळ्यामध्ये या दोघांनीही अंगठ्यांची अदलाबदल केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला. 


अंकिताच्या जीवनातील या खास क्षणांच्या प्रसंगी तिच्या खास मित्रमंडळीचींही हजेरी पाहायला मिळत आहे. 


सेलिब्रिटी वर्तुळातून अंकितासाठी खास असणाऱ्यांध्ये येणारं एक नाव आहे, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं. 


अंकिता आणि सुशांतच्या नात्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. सुशांत आज आपल्यात नसला तरीही त्याचं अस्तित्वं विविध माध्यमांतून जाणवत आहे. अंकिताच्या साखपुडा सोहळ्यामध्येही याची प्रचिती आली. 


मुख्य म्हणजे तिच्या जीवनातील या खास क्षणांना, अप्रत्यक्षपणे सुशांतही उपस्थित होता. तोही एका अनोख्या अंदाजात. 


ज्यावेळी अंकितानं विकीला अंगठी घातली, तेव्हा तिथं एक गाणं वाजलं. हे गाणं होतं, सुशांतच्या 'राबता' या चित्रपटातील. 



आता हा योगायोग  म्हणा किंवा आणखी काही. पण, सुशांतच्या चित्रपटातील गाणं हे क्षण अंकितासाठी आणखी खास करुन गेलं यात शंका नाही. 


जीवनातील एका नव्या प्रवसाची अंकिता सुरुवात करत असतानाच सुशांतकडूनही जणू तिला अनोख्या शुभेच्छाच मिळाल्या अशीच प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी दिली.