मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा आज ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुष्काचे वडील सैन्यात कर्नल असल्याने अनुष्काने संपूर्ण बालपण आर्मी क्वाटर्समध्ये व्यतीत केलं आहे. १ मे १९८८ साली अयोध्यामध्ये अनुष्काचा जन्म झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी झी पुरस्कार सोहळ्यादरम्यान अनुष्काने त्यांच्या घरातील वातावरण इतर कुटुंबापेक्षा कसं वेगळं होतं याबाबत सांगितलं. वडील देशाच्या सेवेत असताना त्यांची आई कशाप्रकारे घर सांभाळायची याबद्दल अनुष्काने सांगितलं आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काने या व्हिडिओमध्ये आर्मी कॅम्पसमध्ये राहणं किती सुखदायक होतं, एका सैनिकाच्या घरातील वातावरण कसं असतं, कशाप्रकारची शिस्त असते, वडील सैन्यात असताना आई किती खंबीरपणे घर साभांळत असते याबाबत सांगितलं. सैन्यातील लोकांच्या आई, पत्नीचं मन अतिशय मोठं असतं. प्रत्येक समस्येशी सामना करण्याचं बळ त्यांच्यात असल्याचं तिनं म्हटलंय.




अनुष्का शर्माने २००८ साली 'रब ने बनादी जोडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलं. उत्तरप्रदेशमधील अयोध्यात अनुष्काचं बालपण गेलं. अनुष्काला मॉडेल किंवा अभिनेत्री नाही तर पत्रकार व्हायचं होतं. एकदा बेंगळुरुच्या मॉलमध्ये खरेदी करत असताना प्रसिद्ध फॅशन डिजायनर वेंडल रॉडिक्सने अनुष्काला पाहिलं आणि त्याचवेळी तिला लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करण्यासाठी ऑफर दिली. एका मॉडेलच्या रुपात अनुष्काला पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर मॉडलिंगमध्ये करियर करण्यासाठी ती मुंबईत आली. आपल्या अभिनयाच्या जोरावर अनुष्काने बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम अभिनेत्रींच्या यादीमध्ये नाव मिळवलं आहे. अनुष्का शर्माने भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीसोबत ११ डिसेंबर रोजी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली.