वाढदिवसाला रेणुका शहाणेंची ही भूमिका जिंकतेय सर्वांचं मन
कृपा करुन देहव्यापार करणाऱ्यांची गुन्हेगारांसोबत तुलना करु नका
मुंबई : परखड मतं मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी पुन्हा एकदा सर्वांचच लक्ष वेधलं आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने एकिकडे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, रेणुका यांनी असे विचार मांडले आहेत, की शुभेच्छांसोबतच त्यांच्या विचारसरणीचीही अनेकांनीच दाद दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देहव्यापार करणाऱ्या वर्गाविषयी आपले विचार मांडत रेणुका यांनी अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांची शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं.
'आई नेहमी म्हणते.... पैसेच सर्वकाही नसतं. पैसे तर गुन्हेगारांकडे आणि देहविक्री करणाऱ्यांकडेही असतात. पण, संपत्ती, पैशांपेक्षा चारित्र्य आणि प्रामाणिकपणाही तितकाच महत्त्वाचा असतो. मला, आज तिच्या म्हणण्याचा अर्थ उमगत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुल्यांचा मला यापूर्वी कधीच इतका अभिमान वाटला नव्हता, असं ट्विट सुचित्राने केलं.
गुन्हेगार आणि देहव्यापारांची तुलना एकाच पारड्यात करण्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी कृष्णमूर्ती यांच्यापुढे काही वास्तववादी मुद्दे मांडत आपलं मत स्पष्ट केलं. देहव्यापार करणाऱ्यांवर लावण्यात आलेल्या चुकीच्या परंपरा बदलण्याची प्रकर्षाने गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. कृपा करुन देहव्यापार करणाऱ्यांची गुन्हेगारांसोबत तुलना करु नका', ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
देहव्यापार करणारे त्यांच्याकडे असणारी गोष्ट विकतात, तर गुन्हेगार हे इतरांच्या गोष्टी हिरावतात. मानवी तस्करीच्या माध्यमातून वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी, जेव्हा कोणाचा विरोधही करता येत नाही अशा वेळी देहव्यापाराच्या विश्वात ढकललं जातं. ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो, तेच त्यांना देहविक्रीस भाग पाडतात हे विदारक वास्तव शहाणे यांनी मांडलं. देहविक्री करणाऱ्यांच्या वेदना त्यांनी यावेळी ट्विटच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला.
आर्थिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या त्यांचं होणारं खच्चीकरण आणि समाजात मिळणारी हीन वागणूक मन विषण्ण करणारी असते, ही बाब शहाणे यांच्या ट्विटमधून प्रतीत झाली. यावेळी त्यांनी गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी असणाऱ्या नेतेमंडळींनाही टोला लगावल्याचं पाहायला मिळालं. अनेकदा गुन्हेगारांनाही समाजात, राजकारणा आदराचं स्थान मिळतं. पण, ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे ती याच देहविक्री करणाऱ्यांमुळे नराधमांकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाला आपली मुलं बळी बडत नाहीत. कारण, समाजाच्या क्रूरतेचा सामना हीच देहवितक्री करणारी मंडळी करतात', असं रेणुका यांनी ट्विटमध्ये लिहिलं.
एकामागोमाग एक ट्विट करत शहाणे यांनी सुचित्रा कृष्णमूर्ती यांची कानउघडणी केली. जे पाहता त्यांनीही शहाणे यांचं म्हणणं पटलं असल्याचं म्हटलं.