#MeToo नाना- तनुश्री वादात `या` अभिनेत्रीची एन्ट्री
या प्रकरणात आता नव्याने एका अभिनेत्रीचं नाव गोवलं गेलं आहे.
मुंबई : #MeToo या मोहिमेला काही महिन्यांपूर्वीत अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या एका लक्षवेधी वक्तव्यानंतर चालना मिळाली. 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप तिने त्यांच्यावर केला होता. ज्यानंतर आरोप- प्रत्यारोपांच्या सत्राला सुरुवात झाली. यातच आता नव्याने एका अभिनेत्रीचं नाव गोवलं गेलं आहे.
'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री डेझी शाह हिला पोलिसांकडून याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. २००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर डेझी ही नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यासोबत सहाय्यक अर्थात असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम पाहात होती.
तनुश्रीने मांडलेल्या प्रसंगावेळी ती (डेझी) सेटवर उपस्थित असल्याचंही कळत आहे. त्याचविषयीचा जबाब तिच्याकडून नोंदवण्यात येणार आहे. ज्यानंतर या प्रकरणाची कारवाई पुढे जाईल असं कळत आहे.
एका गाण्याच्या चित्रीकरणावेळी नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचं म्हणत तनुश्रीने त्यांच्यावर बरेच आरोप केले होते. ज्यानंतर तिने झाल्या प्रकरणी पोलिसांत रितसर तक्रारही दाखल केली होती. दरम्यान, खुद्द नानांनी मात्र ती खोटं बोलत असल्याचं सांगत आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले होते.
जवळपास दहा वर्षांनंतर तनुश्रीने आपल्यासोबत झालेल्या गैरव्यवहारावरुन पडदा उचलला होता. ज्यामागोमाग इतरही बऱ्याच अभिनेत्रींनी कलाविश्वात होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवत काही प्रसिद्ध आणि तितक्याच बड्या प्रस्थांचं खरं रुप सर्वांसमोर आणल्याचं पाहायला मिळालं होतं.