दीपिकाचा `छपाक` ऑनलाईन लीक
`छपाक` चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) 'छपाक' (Chhapaak) चित्रपट अनेक वादांनंतर अखेर प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. बॉक्सऑफिसवरही चित्रपटाबाबत चांगल्या कमाईची अपेक्षा केली जात आहे. मात्र असं असतानाच चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचं समोर आलं आहे.
बॉलिवूड लाईफ डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, तमिलरॉकर्सकडून (Tamilrockers) चित्रपट ऑनलाईन लीक करण्यात आला आहे. चित्रपट लीक झाल्यानंतर आता निर्मात्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नुकताच प्रदर्शित झालेला सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'दरबार' चित्रपटही तमिलरॉकर्सनी ऑनलाईन लीक केला आहे. या चित्रपटाच्या लीकनंतर 'छपाक'वरही हे संकट घोंघावत होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेबसाइटकडून युजर्ससाठी एक लिंक देण्यात आली आहे. ज्याद्वारे 'छपाक'ची एचडी प्रिंट डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
तमिलरॉकर्सकडून अशाप्रकारे चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीदेखील तमिलरॉकर्सनी जवळपास सर्वच बिग बजेट चित्रपटांची पायरसी करत चित्रपट निर्मात्यांना चांगलंच वेठीस धरलं आहे.
दिवाळीनंतर प्रदर्शित झालेला 'हाऊसफुल ४', 'मेड इन चायना', 'सांड की आंख', 'बाला' यांसारखे आणखीही काही चित्रपट बेकायदेशीरित्या डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन दिले आहेत.
तमिलरॉकर्सविरोधात बरेच मोठे निर्माते, दिग्दर्शक तक्रार करत असून हा मुद्दा प्रकर्षाने उचलून धरत आहेत. पण, तरीही चित्रपटांवर पायरसीचा धोका निर्माण होतोच आहे. सतत लीक होणाऱ्या चित्रपटांमुळे कलाविश्वाची डोकेदुखी वाढली आहे. चित्रपट बनवताना एका चित्रपटामागे अनेक लोकांची मेहनत असते. एका चित्रपटामागे कोट्यवधी रुपये लावले जातात. अशातच चित्रपट प्रदर्शनाच्या काही वेळातच लीक होणं हे चित्रपट निर्मात्यांसाठी मोठं नुकसानकारक ठरतं. चित्रपट लीक झाल्याचा थेट परिणाम त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईवर दिसून येतो.
हिंदी, तेलुगू, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांतील चित्रपटांनाही तमिलरॉकर्सचा फटका बसतो आहे. मुख्य म्हणजे त्यांच्याकडून बऱ्याच बनावट वेबसाइट चावलण्यात येत असल्यामुळे, वारंवार डोमेन बदलत असल्यामुळे या वेबसाईटला आळा घालणं, त्या सर्व वेबसाईट बंद करणं हेसुद्धा निर्माते, दिग्दर्शकांपुढचं आव्हानच आहे. पायरसी वाढवणाऱ्या आणि चित्रपट ऑनलाईन लीक करणाऱ्या या साइटवर सरकारने बंदी घातली आहे. मात्र तरीही तमिलरॉकर्सकडून सतत चित्रपट लीक केले जात आहेत.