मुंबई : अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत नेहमीच विविध भूमिकांना न्याय देताना दिसला आहे. त्यात आता आणखी एका भूमिकेचटी बर पडली आहे. कारण, कबीर खान दिग्दर्शित आगामी `८३ या चित्रपटात तो एका क्रिकेट खेळाडूची व्यक्तीरेखा साकारत आहे. फक्त रणवीरच नव्हे, तर अभिनेत्री दीपिका पदुकोणही या चित्रपटातून झळकणार आहे. ती लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल देव यांची भूमिका साकारणाऱ्या रणवीरला या चित्रपटात साथ मिळणार आहे, ती म्हणजे त्याच्या खऱ्या आयुष्यातील सहचारिणीची म्हणजेच दीपिकाची. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा ती साकारणार आहे. 'छपाक' या चित्रपटाची घोषणा करण्याच्या दिवसांतच तिला `८३चा प्रस्ताव आला. ज्यात भूमिका साकारण्यासाठी ती प्रचंड उत्सुक आहे. 


रणवीरसोबतचा लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच चित्रपट ठरत आहे. 'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयीची माहिती दिली. सोबतच लग्नानंतर रणवीरसोबत स्क्रीन शेअर करण्याविषयीसुद्धा तिने आपला विचार मांडला. खासगी आयुष्यातील समीकरणांचा परिणाम हा कामाच्या बाबतीत होऊ देणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. रणवीरने जरी या चित्रपटात कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारली नसती तरीही आपण या चित्रपटाचा भाग होण्यास नकार दिला नसता, असं ती म्हणाली. 


रोमी भाटिया यांच्यासोबत दीपिकाने बराच संवाद साधत त्यांच्या मनात चित्रपटाविषयी प्रचंड अभिमान असल्याची बाब स्पष्ट केली. रोमी यांचा अनोखा अंदाज हा त्यावेळी प्रचंड गाजला होता. त्यांचा अनोखा हेअरकटही त्याचाच एक भाग. अगदी तसाच हेअरकट करणार का, असं विचारलं असता दीपिकाने याविषयी मात्र फार माहिती न सांगताच उत्सुकता ताणून धरली. 


दीपिकाच्या कुटुंबात क्रीडा क्षेत्राची पार्श्वभूमी आहे. त्यातही रणवीरही क्रिकेटप्रेमी आहे. त्यामुळे या जोडीसाठी हा चित्रपट फारसा आव्हानात्मक ठरला नाही. उलटपक्षी त्या दोघांसाठीही हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा ठरला. ज्या माध्यमातून ते दोघंही एकमेकांना आणखी चांगल्या पद्धतीने ओळखूही लागले.