मुंबई : विविध चित्रपटांच्या माध्यमातून अफलातून भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री, मुलगी, पत्नी अशा विविध भूमिकांमध्ये दीपिका स्वत:ची जबाबदारी अतिशय लिलया पेलत आहे. या नात्यांसोबतच तिने आणखी काही नातीही तितक्याच आत्मियतेने जपली आहेत. ही नाती म्हणजे चाहते आणि माध्यमांसोबतची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती आहे, इतकं प्रेम दीपिकाला चाहत्यांकडून मिळतं. तर, माध्यमांचे प्रतिनिधी आपल्या खास मंडळींपैकी एक असल्याचं खुद्द दीपिकाही जाणते आणि त्यांच्याशी त्याच पद्धतीने वागतेही. अगदी त्यांच्याशी संवाद साधणं असो किंवा मग त्यांच्या कामाप्रती कुतूहल आणि कामाच्या स्वरुपाविषयी काळजी व्यक्त करणं असो. दीपिका कायमच यात पुढे राहिली आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ याची प्रचिती देऊन जात आहे. ज्यामध्ये विमानतळावर पोहोचताच दीपिकाची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकार लगबगीने पुढे येताना दिसतात. 'दीपिका मॅम, दीपिका मॅम', असं म्हणत तिला हाकही मारतात. त्यांचा तो उत्साह आणि लगबग पाहून दीपिकाही त्यांना कुतूहलाने एक प्रश्न विचारताना दिसते. 'तुम्ही लोक थकत नाही का?', असा प्रश्न करुन ती स्मितहास्य करत पुढे निघून जाते. तिचा हाच अंदाज चाहत्यांचीही मनं जिंकून जातो. 




माध्यमांच्या प्रतिनिधींशी दीपिकाचं हे असं वागणं पाहायला मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा पुरस्कार सोहळे म्हणू नका, लग्नसोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेला दिमाखदार स्वागतसोहळा म्हणू नका, किंवा छायाचित्रकाराला आपल्या कारमध्ये बसायला सांगणं म्हणू नका, दीपिकाने कायमच काही गोष्टींमध्ये पुढाकार घेतला आहे.