‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट पाहिल्यानंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली `यापुढे भविष्यात...`
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
Genelia Deshmukh Review Bade Miyan Chote Miyan : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची मुख्य भूमिका असलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट बुधवारी (10 एप्रिल 2024) प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचा रिमेक असल्याचे बोललं जात आहे. आता या चित्रपटाबद्दल अभिनेत्री जिनीलिया देशमुख हिने प्रतिक्रिया दिली आहे.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या टीमने एका खास स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. या स्क्रिनिंगला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शकांनी हजेरी लावली. आता हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक कलाकार या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेत्री जिनिलिया देशमुखने याबद्दल एक प्रतिक्रिया दिली आहे. जिनिलिया देशमुख ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने आता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल सांगितले आहे.
जिनिलिया देशमुखची प्रतिक्रिया
"मी काल रात्री बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट पाहिला. मला हा चित्रपट प्रचंड आवडला. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्यातील केमिस्ट्री फारच अप्रतिम आहे. पृथ्वीराज सुकुमारन तुम्ही खरंच मस्त आहात, यापुढे भविष्यातही तुमचे चित्रपट पाहता येतील. जॅकी भगनानी, वासू भगनानी आणि दिपशिखा देशमुख खूपच छान चित्रपटाची निर्मिती. अली अब्बास जाफर तुमच्यापेक्षा कोणीही हा चित्रपट उत्तमरित्या साकारु शकत नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळावे ही सदिच्छा", असे जिनिलियाने म्हटले आहे. जिनिलियाची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
चित्रपटात जबरदस्त अॅक्शन
दरम्यान ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच यात जबरदस्त अॅक्शनही दिसत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकत आहेत. या चित्रपटासाठी एकूण 350 कोटी रुपये खर्च झाला आहे.