बॉलिवूडच्या सुंदऱ्या कशा फसल्या जाळ्यात? ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
बॉलिवूड अभिनेत्रींना लीलया आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या या सुकेश चंद्रशेखरच्या सुरस कहाण्या आता समोर येत आहेत.
मुंबई : बातमी एका ठकसेनाची आहे. बॉलिवूड अभिनेत्रींना लीलया आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या या सुकेश चंद्रशेखरच्या सुरस कहाण्या आता समोर येत आहेत. खुद्द जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही यांच्या जबाबामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. (bollywood actress jacqueline fernandez nora fatehi sukesh chandrashekhar)
सुकेश चंद्रशेखर हे नाव गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही यांच्यासह अनेक बॉलिवूड ब्युटीज् त्याच्या जाळ्यात ओढल्या गेल्या आहेत.
केवळ अर्ध्या तासाच्या गप्पांमध्ये भुलवण्याची विद्या या महाठकाला अवगत असल्याचं समोर आलंय. कधी तो राजकीय विश्लेषक असल्याचं सांगायचा, कधी ब्युरोक्रॅट तर कधी ब्रॉडकास्ट कंपनीचा मालक असल्याचं सांगायचा.
मॉडेल लीना मारिया हिच्या जोडीनं सुकेशनं हा बनवाबनवीचा उद्योग सुरू केला होता. जॅकलिन, नोरा यांनी ईडीला दिलेल्या जबाबात या सुकेशच्या सुरस कहाण्या समोर आल्यात.
सुकेश आपल्यासाठी वेडा झाला होता, असं जॅकलिननं ईडीला सांगितलं. डिसेंबर 2020पासून तो तिच्या मागे होता. तुरूंगातून तिला फोन करत असायचा. मात्र तिनं त्याला कधी उत्तर दिलं नाही. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मेकअप आर्टिस्ट शान मुठ्ठील याला कुणीतरी फोन केला. आपण सरकारी अधिकारी असून जॅकलीनला शेखर रत्नवेला याच्याशी बोलायला सांगा असा निरोप दिला.
हा शेखर दुसरातिसरा कुणी नसून सुकेश होता. आपण सन टीव्हीचा मालक असल्याची बतावणी त्यानं केली. जॅकलिनसोबत सिनेमा बनवायचा प्रस्ताव ठेवत त्यानं तिला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर तिच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला.
ईडीच्या अंदाजानुसार त्यानं तब्बल 10 कोटी रुपये जॅकलिनवर उधळले. हिऱ्याचे दागिने, इम्पोर्टेड क्रोकरी, 52 लाखांचा घोडा, 9 लाख रुपये प्रत्येकी किंमत असलेल्या 4 पर्शियन मांजरी तिला दिल्या. तिच्यासाठी अनेकदा चार्टर्ड फ्लाईट बुक केली. वेगवेगळ्या महागड्या हॉटेलमध्ये रूम बुक केल्या.
एकीकडे जॅकलिनवर जाळं टाकलं असतानाच नोरा फतेही हीदेखील या मायाजालात फसत होती. ईडीनं नोराला 45 क्रमांकाची साक्षीदार बनवलं असून तिच्या जबाबात सुकेशचे आणखी कारनामे समोर आलेत.
एक्सिड एन्टरटेनमेंट प्रायवेट लिमिटेडचा मालक असल्याचं सांगत सुकेशनं नोराशी संपर्क साधला. लीनाच्या माध्यमातून चॅरिटी शोसाठी तिला चेन्नईला बोलावलं. तिथल्या हॉटेल लीना पॅलेसमध्ये बँक्वेट हॉल बुक केला.
इव्हेंटनंतर गुचीची महागडी बॅग आणि आयफोन लीनानं नोराला दिला. त्यानंतर लीनानं आपला पती असल्याचं सांगत सुकेशला फोन केला. सुकेशनं BMW भेट देण्याची इच्छा बोलून दाखवली. नोरानं नकार दिल्यानंतरही बॉबी या नावानं 5 सिरीजची BMW बुक करून नोराला गिफ्ट करण्यात आली.
अवघ्या 17व्या वर्षापासून बनवाबनवीत माहीर असलेल्या सुकेश अय्याश असल्याचंही सांगितलं जातंय. तपासात सुकेशच्या आणखी अनेक चमत्कारिक कथा समोर येतील. एका चित्रपटाची कथा शोभेल, असं हे कथानक आहे.