मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांपासून बायोपिक चित्रपटांची चलती आहे, त्याचप्रमाणे रिमेकचा ट्रेंडही चांगलाच स्थिरावला आहे. याच ट्रेंडअंतर्गत आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची चिन्हं आहेत. तो चित्रपट म्हणजे 'अर्थ'. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट यांच्या 'अर्थ' या चित्रपटाचा रिमेक साकारला जाणार आहे. ज्यामधील स्मिता पाटील यांच्या भूमिकेसाठी निर्माते, दिग्दर्शकांनी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नावाला पसंती दिल्याचं कळत आहे. २०१७ मध्ये शरद चंद्र यांनी चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केली होती.


स्मिता पाटील यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी जॅकलिनचं नाव पुढे येत असलं तरीही अद्यापही याविषयी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, तिने हा चित्रपट स्वीकारला तर, प्रेक्षकांच्या तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणि स्मिता पाटील यांच्या भूमिकेची एकंदर लोकप्रियता पाहता तिच्यासाठी हे मोठं आव्हान असणार आहे. 



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनला या भूमिकेविषयी विचारण्यात आलं आहे. इतकच नव्हे तर, तिला संकल्पना आणि भूमिका दोन्ही आवडलं असून, या चित्रपटाच्या रिमेकसाठी तीसुद्धा उत्सुक असल्याचं कळत आहे. 


१९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अर्थ' या चित्रपटातून अभिनेत्री शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा आणि स्मिता पाटील हे कलाकार झळकले होते. अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशी विषयावर प्रकाशझोत टाकत हा चित्रपट साकारण्यात आला होता. त्यामुळे आता त्याच्या रिमेकमध्ये नेमकं कोणतं कथानक साकारलं जाणार याविषयीसुद्धा चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहयला मिळत आहे.