`पती कुठे आहे?`, विचारणाऱ्यांना कल्कीचं उत्तर
काही दिवसांपूर्वीच ती गरोदर असल्याचं कळलं होतं.
मुंबई : काही चौकटीबाहेच्या भूमिका साकारत सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या बऱ्याच अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे कल्की केक्ला. अभिनय विश्वात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या कल्कीटच्या जीवनाला एता एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. Guy Hershberg या आपल्या जोडीदारासोबत ती तिच्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. सध्या गरोदरपणातील दिवसांचा आनंद घेणारी कल्की एक अभिनेत्री असण्यासोबत आता एक आई म्हणूनही वावरत आहे.
कल्कीने बऱ्याच महिन्यांनंतर तिच्या गरोदरपणाविषयीची माहिती दिली होती. ज्यामुळे काहींना तर धक्काच बसला. विवाहबंधनात नसूनही तिचं गरोदर असणं काहींना पचलं नाही. याच मुद्द्यावरुन तिची सोशल मीडियावर खिल्लीही उडवण्यात आली. याचविषयी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत तिने तिचं मत मांडलं आहे.
तुझा पती कुठे आहे...?, आता घट्ट कपडे नको घालत जाऊस वगैरे म्हणत खिल्ली उडवणाऱ्यांना आणि मतप्रदर्शन करणाऱ्यांना पाहून मिश्किलपणे तिने यावर प्रतिक्रिया दिली. खिल्ली आताच उडवली जाते असं नाही. तुम्ही गरोदर नसतानाही खिल्ली उडवली जातेच. किंबहुना तुम्ही एखादे सेलिब्रिटी नसता, पण तुमचं काहीसं चौकटीबाहेर जाणारं मत असतंच.... अशीच ती मतं आहेत. प्रत्येकाची अशी वेगळी भूमिका आहे, यात वावगं काहीच नाही असं तिने स्पष्ट केलं.
लग्नाच्या बंधनात न अडकता साथीदारासोबत एका बाळाला जन्म देण्याच्या निर्णयाविषयी एकिकडे अशा प्रतिक्रिया येत असतानाच दुसरीक़डे आपल्या इमारतीमधील व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, शेजारी आणि कलाविश्वातील काही सेलिब्रिटी मित्र यांच्याकडून अतिशय आपलेपणाची वागणूक मिळाल्याचं कल्की म्हणाली. मातृत्वाविषयीच्या तिच्या संकल्पना आणि पावलोपावली येणारे अनुभव हे सारंकाही आपल्या सोबत गेत कल्की तिच्या जीवनातील अतिशय आनंददायी दिवसांत रमली आहे, हेच तिच्या बोलण्यातून स्पष्ट झालं.