`आता कंगना शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली`; `क्वीन` पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
जो झोपी गेला आहे.....
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून, किंबहुना ठामपणे आपल्या भूमिका सातत्यानं मांडत आलेली अभिनेत्री कंगना राणौत kangana ranaut ही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकते. मागील काही दिवसांमध्ये याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. मुंबई पोलीस, मुंबईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारी ही अभिनेत्री पाहता पाहता शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेच्या निशाण्यावर आली. तरीही तिनं आपली टीकास्त्र काही कमी केली नाहीत. आता याच अभिनेत्रीनं एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन केंद्रातील सरकारविरुद्ध शेतकरी असं एकंदर चित्र गडद होत आहे. यासाठीच्या आंदोलनांनाही गंभीर वळण प्राप्त होऊ लागलं आहे. असं असतानाच कंगनानं या आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी करत एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटचा आधार घेत कंगनानं तिची भूमिका स्पष्ट केली. कृषी विधेयकानंतर मोदींनी शेतकऱ्यांना उद्देशून एक ट्विट केलं. ज्यामध्ये त्यांनी आपलं सकरार हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असल्याची बाब स्पष्ट केली. 'मी यापूर्वीही सांगितलं आहे आणि आता पुन्हा सांगत आहे. एमएसपीची व्यवस्था यापुढेही सुरु राहिल. शेतमालाची खरेदी सरकार करणार आहे. आम्ही इथं शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच आहोत. अन्नदाता असणाऱ्या बळीराज्याच्या सेवेसाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या भावी पिढीसाठी समृद्ध जीवनाची शाश्वतीही देणार आहोत', असं मोदींनी ट्विट करत लिहिलं.
कृषी विधेयकं दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाल्यानंतर हरियाणा, पंजाब या भागांमध्ये आंदोलनांनी डोकं वर काढलं. काही शेतकरी संघटनांनीही असाच सूर आळवला. ही परिस्थिती पाहता खुद्द पंतप्रधानांनी एक ट्विट करत बळीराजाला हमी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच ट्विटचा आधार घेत बी- टाऊनच्या क्वीननं तिचं मतही मांडलं.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, जो झोपी गेला आहे त्याला जागवता येऊ शकतं. ज्याला गैरसमज आहेत ते दूरही करता येऊ शकतात, त्यांची समजूत काढता येऊ शकते. पण, झोपण्याचं आणि काहीही न समजल्याचा अभिनय कोणी करत असेल तर तसं सोंग कोणी घेत असेल त्यांना समजावण्यामुळं काय फरक पडणार आहे? CAA ला विरोध करणारे हे तेच दहशतवादी आहेत. CAA विरोधातील आंदोलनात रक्ताचे पाट वाहिले. पण, या कायद्यामुळं एकाही व्यक्तीचं नागरिकत्व हिरावलं गेलं नाही', असं कंगनानं तिच्या ट्विटमध्ये लिहिलं.
कंगनाच्या या ट्विटवर अनेक लगेचच अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. केंद्राच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या काँग्रेसकडूनही यायवर संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत लिहिलं, 'आता कंगना राणौत शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली. मोदी सरकार आणि भाजपच्या नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी सरकारने दिलेल्या वाय श्रेणी सुरक्षा व पाठिंब्यामुळे भाजपाची ही झांसी की रानी इतकी शेफारली आहे. आम्ही भाजपा आणि कंगना या दोघांचा जाहीर निषेध करत आहोत'. कंगना आणि तिची सरकारच्या समर्थनार्थ असणारी भूमिका पाहता तिचा विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात आहे. तेव्हा आता हे नवं प्रकरण नेमकं कोणतं वळण घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.