राम मंदिर, बाबरी मशीद प्रकरणावर चित्रपट साकारणार बी- टाऊन अभिनेत्री
काही दिवसांपूर्वीच याप्रकरणीचा अतिशय महत्त्वाचा निर्णय़ सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आला.
मुंबई : अभिनय जगतात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत हिने आता तिच्या कारकिर्दीच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. अभिनयासोबतच आता ही 'क्वीन' चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही नशीब आजमावणार आहे. राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणीच्या मुद्द्यावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीसाठी कंगना पुढे सरसावल्याचं स्पष्ट होत आहे.
'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार पुढच्या वर्षी 'अपराजिता अयोध्या' नावाच्या या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल. ज्याच्या कथा- पटकथा लेखनाची जबाबदारी के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी घेतली आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिनेही ट्विट करत याविषयीची माहिती दिली.
खुद्द कंगनानेही तिच्या या नव्या कारकिर्दीचा उलगडा केला. मध्यवर्ती भूमिकेत झळकणाऱ्या कलाकाराचा कोणत्याही गोष्टीवर विश्वास नसण्यापासून विश्वासापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून पाहता येणार आहे. एका अर्थी या चित्रपटाच्या माध्यमातून आपलाच प्रवास परावर्तित होत असल्यामुळे चित्रपट निर्मितीसाठी ही उत्तम संधी असल्याचं ती म्हणाली होती.
काही दिवसांपूर्वीच अयोध्या राम मंदिर आणि बाबरी मशीद वादग्रस्त भूखंड प्रकरणी एक महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. ज्यामध्ये २.७७ एकरांची वादग्रस्त जमीन ही राम मंदिरासाठी देण्याचा निर्णय घेत त्यासाठी न्यासाची स्थापना करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. तर, मशिदीसाठीही अयोध्येतच पाच एकरांचा पर्यायी भूखंड देण्याचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने दिला. राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा या निर्णयावर सुवानण्यात आलेल्या याच निर्णयाच्या आधारे आता कंगनाच्या निर्मितीअंतर्गत साकारला जाणारा चित्रपट अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. अद्यापही या चित्रपटाची अधिकृत घोषणा प्रतिक्षेत आहे.