मुंबई : सोशल मीडियापासून कलाविश्वापर्यंत आणि सर्वसामान्यांमध्येही अनेकांच्याच निशाण्यावर असणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिनं काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून कमालीचा विरोध झाला. ज्यानंतर अग्रिमानं माफीही मागितली. पण, या माफीनं तिच्यावरचा इतरांच्या मनात असणारा राग मात्र निवळलेला नाही. या प्रकरणात आता अभिनेत्री कंगना राणौत हिनंही उडी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनानं तिची प्रतिक्रिया सर्वांपुढं मांडत अग्रिमा आणि तिच्यासारख्या अनेकांनाच थेट शब्दांत खडे बोल सुनावले आहेत. या प्रकरणीचा एक व्हिडिओ पोस्ट करत टीम कंगना राणौत या ट्विटर अकाऊंटवरुन हिंदी कलाविश्वाची ही 'क्वीन' व्यक्त झाली आहे. 


'दोन पैशांचीही किंमत नसणाऱ्या आणि कोणीही न जुमानणारे हे लोक हुतात्म्यांची खिल्ली उडवतात. हे मुळीच योग्य नाही. हुतात्म्यांवर कोणीही विनोद करु नये. अनेकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या आणि देशासाठी थोर असणाऱ्या या मंडळींची खुल्ली उडवणाऱ्यांविरोधात कारवाई करणारा कडक कायदा अस्तित्वात असण्याची गरज आहे', असं ठाम मत कंगनानं मांडलं. 



 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अग्रिमा जोशुआ हिच्या वक्तव्यानं कलाविश्व आणि सोशल मीडियावर एक वादळ आलं. आपल्या वक्तव्यामुळं चिघळलेल्या या प्रकरणावर अग्रिमानं माफीनामाही दिला. पण, विरोध काही केल्या शमला नाही. किंबहुना अनेकांनीच तिला धमक्याही दिल्याचं पाहायला मिळालं होतं.