मुंबई : 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून अभिनेत्री कंगना रानौत हीची एक वेगळी प्रतिमा कलाविश्वात आणि चाहत्यांच्या वर्तुळात तयार झाली आहे. अनेक वर्षांपासूनचा तिचा हृतिकसोबतचा वाद असो किंवा मग सूरज पांचोलीसोबतचा वाद, कंगना कायमच माध्यमांमध्ये या वादांमुळे चर्चेत राहिली. सध्याच्या घडीला ही 'क्वीन' एका पत्रकाराशी केलेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे चर्चेता विषय ठरत आहे. पण, कायमच बॉलिवूडमधील काही बड्या प्रस्थांविषयी बोलत असल्यामुळे आपल्यावर नेहमीच टीकेची झोड उठवली जाते अशाच मतावर ती ठाम आहे, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तुम्ही जर काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रकरणाविषयी बोलत असाल तर, मी एका गोष्टीचं अतिशय चांगल्या पद्धतीने निरीक्षण केलं आहे की हृतिक रोशन, करण जोहर किंवा अशा ठराविक बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात मी काहीही म्हटलं तर लगेचच माझ्याविरोधात मुंबईच्या पत्रकारांची एक फळीच तयार होते', असं कंगना आयएएनएसशी संवाद साधताना म्हणाली. 


काही दिवसांपूर्वीच एका पत्रकाराशी झालेल्या वादानंतर कंगनावर पत्रकार वर्गाकडून मोठ्या प्रमाणात आगपाखड करण्यात येत आहे. पत्रकारांप्रतीची तिची वागणूक पाहता तिच्या आगामी 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाच्या प्रसिद्धीचा निषेधही करण्यात आला होता. 


आपल्याविषयीची माध्यमांची ही भूमिका पाहताना कंगनाने काही गोष्टी उघड केल्या. 'गेल्या दोन- तीन वर्षांपासून माझ्य़ाविषयी काहीही बातम्या देण्यात येत आहेत. मी आता या परिस्थितीने त्रासले आहे. त्या दिवशी जे काही घडलं ती एक प्रतिक्रिया होती. माझ्याविरोधात माध्यमांची जी भूमिका आहे, माझी प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे त्यावरच ती प्रतिक्रिया होती', असं कंगना म्हणाली. ते सारं झालं नसतं तर माझीही चांगली प्रतिमा असती, कारण माध्यमांमध्ये आपलेही काही चांगले मित्र असल्याचं तिने स्पष्ट केलं.


माध्यमांमध्ये आपले काही खास आणि तितकेच जवळचे मित्र असल्याचं सांगत त्यांच्यापाशी अनेकद मी व्यक्त झाले आहे, पण त्यांनी कधीच याविषयी बाहेर कुठेही वाच्यता केली नाही याचा खुलासा तिने केला. ज्याप्रमाणे सर्वच स्वत:ला अभिनेते म्हणवतात मात्र ते तसे नसतात त्याचप्रमाणे आपल्या पदाचा वापर करत एखाद्याच्या विरोधात गटबाजी करत एखाद्या मुलीची अशी खिल्ली उडवणं ही माझ्यालेखी पत्रकारिता नाही, असं ठाम मत तिने मांडलं.