बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Government) कावड यात्रेसंबंधी (Kanwar Yatra) काढलेल्या आदेशावर टीका केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रा मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांना मालकांची नावं प्रदर्शित करण्याचे निर्देश  दिले असून सोनू सूदने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सोनू सूदने एक्सवर पोस्ट लिहिली असून दुकानाच्या नेमप्लेटवर फक्त "माणुसकी" प्रदर्शित व्हावी असं लिहिलं आहे. सोनू सूदच्या पोस्टनंतर अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) अभिनेत्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Government) कावड यात्रा (Kanwar Yatra) मार्गावरील दुकानं आणि भोजनालयांवर मालकांची नावं प्रदर्शित करणे बंधनकारक केलं असून, तसा आदेश काढला आहे. या आदेशावरुन वाद सुरु झाला आहे. सोनू सूदने एक्सवर पोस्ट शेअर करत त्यात लिहिलं आहे की, "प्रत्येक दुकानावर फक्त एकच नाव हवं, माणुसकी".



सोनू सूदच्या या पोस्टवर अनेकांनी टीका केली आहे. कंगना रणौतने यावर टीका केली असून रिट्वीट करत लिहिलं आहे की, "सहमत! हलालची जागा माणुसकीने घेतली पाहिजे". याआधी, जावेद अख्तर यांनीही या घटनेवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देत प्रशासनावर जोरदार टीका केली होती.



"मुझफ्फरनगर यूपी पोलिसांनी सूचना दिल्या आहेत की भविष्यात एखाद्या विशिष्ट धार्मिक मिरवणुकीच्या मार्गावर सर्व दुकाने आणि अगदी वाहनांवर मालकाचे नाव ठळकपणे आणि स्पष्टपणे दाखवावे. का? नाझी जर्मनीमध्ये ते ठराविक घर आणि दुकानावर एक चिन्ह बनवायचे," असं जावेद अख्तर यांनी X वर पोस्ट केले.


शुक्रवारी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यात्रेकरूंच्या श्रद्धेचे पावित्र्य राखण्यासाठी कावड मार्गावरील खाद्यपदार्थ आणि पेयांच्या दुकानांनी ऑपरेटर/मालकाचे नाव आणि ओळख प्रदर्शित केली पाहिजे असा आदेश दिला. याशिवाय, हलाल-प्रमाणित उत्पादने विकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कावड यात्रेच्या मार्गावर येणाऱ्या राज्यातील सर्व दुकानांमध्ये ओळखपत्र वापरण्याची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने काढलेल्या आदेशामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.