केस गळले, चेहरा बदलला; Breast Cancer मुळं अशी दिसतेय महिमा चौधरी
आजारपणामुळं खचलेल्या या बॉलिवूड अभिनेत्रीला पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले
मुंबई : 'परदेस' चित्रपट पाहिला किंवा 'दो दिल मिल रहे है...' हे गाणं ऐकल्यानंतर लगेचच डोळ्यांसमोर एक हसरा चेहरा येतो. मनात घर करणारा असा हा चेहरा आहे, अभिनेत्री महिमा चौधरी हिचा. हिंदी चित्रपट जगतामध्ये एक काळ गाजवणारी महिमा लाखोंच्या हृदयावर राज करत होती. काळ बदलला, नव्या अभिनेत्रींनी रुपेरी पडदा गाजवण्यास सुरुवात केली.
महिमा रुपेरी पडद्यापासून दुरावली. पण, तिची लोकप्रियता मात्र कमी झाली नाही. आता हीच महिमा चौधरी (Mahima Chaudhry Breast Cancer ) अशा रुपात समोर आली आहे, जिच्याकडे पाहून काळजाचं पाणी होत आहे.
स्तनांचा कर्करोग अर्थात ब्रेस्ट कॅन्सरमुळे महिमाचं रुप पूर्णपणे बदललं आहे, केमोथेरेपीमुळं केसही गळले आहेत. पण, या आजारावर मात करत असताना तिला सर्वात मोठा आधार दिला आहे तो म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी.
(Chemotherapy) आणि कॅन्सच्या उपचारांमधून जात असतानाच अनुपम खेर यांनी महिमाशी संपर्क साधला. एका प्रोजेक्टसाठी त्यांनी तिला फोन केला जेव्हा नाईलाजानं तिला आपल्याला कॅन्सरचं निदान झाल्याचं त्यांना सांगावं लागलं.
सेटवर मी विग घालून आले तर चालेल का, असं महिमानं खेर यांना विचारताच त्यांच्या मनात बरेच प्रश्न आले. महिमानंही त्या प्रश्नांची उत्तरं दिली. कॅन्सरचं नाव ऐकल्यानंतरच मनातली भीती दुपटीनं वाढल्याचं सांगताना महिमाच्या भावनांचा बांध फुटला आणि ती रडू लागली.
खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आपला आतापर्यंतचा प्रवास आणि कॅन्सरला नमवण्याची तिची जिद्द सर्वांनीच पाहिली. कॅन्सरच्याच रुग्णांकडून तिला प्रेरणाही मिळाली. शिवाय अनुपम खेर यांनीही आपल्याला मोठा आधार दिल्याचं महिमानं या व्हिडीओमध्ये सांगितलं.
एक आघाडीची अभिनेत्री असणारी महिमा सध्या तिच्या आजारपणावर मात करण्यासोबत पुन्हा एकदा कलाजगतामध्ये तिचं नशीब आजमावू पाहत आहे. कोणत्याही आघातानं न कोलमडलेल्या महिमाकडे पाहताना नकळतच तिच्या कौतुकासाठीचे शब्द तोंडून बाहेर पडत आहेत.