मुंबई : बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी त्यांच्या पहिल्या वहिल्या चित्रपटातूनचं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यापैकीच एक म्हणजे महिमा चौधरी. १३ सप्टेंबर १९७३ मध्ये दार्जिंलिंगमध्ये महिमाचा जन्म झाला. आज महिमा तिचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या चित्रपटांपासून दूर असलेल्या महिमाने १९९० मध्ये मिस इंडिया किताब जिंकला होता. त्यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली. महिमाने व्हिडिओ जॉकी (RJ) म्हणूनही काम केलंय. महिमाने १९९७ मध्ये 'परदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 


'परदेस' चित्रपटासाठी सुभाष घई एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. 'परदेस'साठी जवळपास ३ हजार मुलींनी ऑडिशन दिलं होतं. ३ हजार मुलींमधून सुभाष घईंनी महिमा चौधरीला आपल्या चित्रपटाची अभिनेत्री म्हणून कास्ट केलं. 



महिमाचं खरं नाव रितु चौधरी. पण महिमाची चित्रपटासाठी निवड झाल्यानंतर सुभाष घईंनी 'एम' अक्षर आपल्यासाठी लकी असल्याचं मानत, रितु चौधरी नाव बदलून महिमा चौधरी ठेवलं. तेव्हापासून महिमाला त्याच नावाने ओळखलं जाऊ लागलं.


'परदेस' चित्रपटासाठी महिमाला बेस्ट फिमेल डेब्यूचा फिल्मफेयर अवॉर्डही मिळाला. याशिवाय याच चित्रपटासाठी ती सर्वोत्तम अभिनेत्री म्हणूनही नॉमिनेट झाली होती.


महिमाने दाग द फायर, धडकन, दिल क्या करे, दिवाने, दिल है तुम्हारा, ओम जय जगदीश, बागबान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 



इंडस्ट्रीतून मोठा ब्रेक घेतल्यानंतर, महिमा २०१६ मध्ये डार्क चॉकलेट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटानंतर ती इंडस्ट्रीपासून लांब आहे. 


महिमा टेनिस खेळाडू लिएंडर पेससोबत ६ वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. पण त्याचं नातं टिकू शकलं नाही. महिमाशी ब्रेकअप झाल्यानंतर लिएंडर पेसने रिया पिल्लईशी लग्न केलं. 


ब्रेकअपनंतर महिमानेही २००६ मध्ये व्यावसायिक बॉबी मुखर्जीशी लग्न केलं. पण २०१३ मध्ये या दोघांचे मार्ग वेगळे झाले.